भीषण अपघातात तीन वर्षीय चिमुकली जागीच ठार
By सचिन राऊत | Updated: May 24, 2024 22:01 IST2024-05-24T22:00:49+5:302024-05-24T22:01:01+5:30
आइ वडील गंभीर जखमी, उड्डाणपुलाजवळील घटना

भीषण अपघातात तीन वर्षीय चिमुकली जागीच ठार
अकाेला : अकोला-पातूर राेडवरील हिंगणानजीकच्या उड्डाणपुलाजवळ भीषण अपघातात ३ वर्षीय चिमुकली जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी समाेर आली. या अपघातात तिची आई व वडील दाेघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
चांदुर खडकी येथील रहिवासी नितीन देवलाल वाघमारे शेतातून घरी परत होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी शुभांगी आणि ३ वर्षाची मुलगी समृद्धी होती. याच दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत समृद्धीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर नितीन यांना किरकोळ मार लागला. त्यांची पत्नी शुभांगी गंभीर जखमी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच खदान पोलीस व जुने शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. वाहनचालकांनी नियमांचे पालन करून आणि जबाबदारीने वाहन चालवून अशा घटना टाळण्याचा प्रयत्न करावे असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.
ट्रक चालक वाहकी जखमी
अपघातानंतर ट्रक चालक घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांनाच दुसऱ्या ट्रकला धडक दिली. या अपघातात दोन्ही ट्रकचे वाहक व चालक जखमी झाले. त्यामूळे त्यांच्यावरही शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र वाघमारे कुटुंबीयांवर या अपघातामूळे दुखाचा डाेंगर काेसळला.