५० फूट खोल विहिरीत पडलेल्या हरिणाला सुखरुप बाहेर काढले
By Atul.jaiswal | Updated: August 9, 2022 16:31 IST2022-08-09T16:30:13+5:302022-08-09T16:31:03+5:30
अकोला तालुक्यातील बाखराबाद शेतशिवारातील एका ५० फुट कोरड्या विहिरीत पडलेल्या हरिणाला सुखरुपपणे बाहेर काढून वनविभाग व ग्रामस्थांनी त्याला जीवनदान दिल्याची घटना मंगळवारी घडली.

५० फूट खोल विहिरीत पडलेल्या हरिणाला सुखरुप बाहेर काढले
-अतुल जयस्वाल
अकोला : तालुक्यातील बाखराबाद शेतशिवारातील एका ५० फुट कोरड्या विहिरीत पडलेल्या हरिणाला सुखरुपपणे बाहेर काढून वनविभाग व ग्रामस्थांनी त्याला जीवनदान दिल्याची घटना मंगळवारी घडली.
सध्या शेतांमध्ये विविध पिके बहरली असून, त्यावर ताव मारण्यासाठी हरिणांचे मोठे कळप शेतांमध्ये दिसून येतात. अनेक शेतांमध्ये काठ नसलेल्या विहिरी आहेत. झाडेझुडपे वाढल्याने अशा विहिरी सहजासहजी दिसत नाहीत. बाखराबाद येथील संजय माळी यांच्या शेतातील अशाच ५० फुट खोल असलेल्या कोरड्या मंगळवारी सकाळी एक हरिण पडल्याची माहिती वनविभागाला मिळाली. वनपरिक्षेत्र अधिकारी ओवे यांनी तातडीने रेस्क्यू टीम घटनास्थळी पाठविली. मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, वनरक्षक बेलसरे, यशपाल इंगोले, गजानन म्हातारमारे, अक्षय खंडारे यांचा समावेश असलेली रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहाेचली तेव्हा त्यांना विहिरीत पडलेले हरिण दिसून आले.
टीमने तातडीने हरिणाला विहिरीतून बाहेर काढले. या कामात दिनेश सुर्यवंशी व रामदास भोसले या ग्रामस्थांनी मदत केली. हरणाचे रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. विहरीतून बाहेर पडताच हरणाने शेतात धुम ठोकली. शेतातील विहिरींना संरक्षक जाळ्या लावाव्यात जेणेकरून वन्यप्राणी त्यामध्ये पडणार नाहीत, असे आवाहन मानद वन्य जीव रक्षक बाळ काळणे यांनी केले.