वाशिम जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांना ९७.९४ कोटींची मदत

By Admin | Updated: August 17, 2014 01:29 IST2014-08-17T01:21:39+5:302014-08-17T01:29:17+5:30

पीक विमा मुदत वाढवून मिळावी, राज्य शासन केंद्र सरकारकडे करणार मागणी- उप मुख्यमंत्री अजित पवार.

97.94 crore assistance to hailstorm affected people in Washim district | वाशिम जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांना ९७.९४ कोटींची मदत

वाशिम जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांना ९७.९४ कोटींची मदत

वाशिम : जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांना ९७.९४ कोटी रुपये राज्य शासनाकडून देण्यात आले असून, त्यातून आतापर्यंंंत ५८ कोटी ५९ लाख ८२ हजार रुपयांचे शेतकर्‍यांना वाटप झाल्याची माहिती उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
जिल्ह्यातील अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी वाशिमचे पालकमंत्री मनोहरराव नाईक, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आ. प्रकाश डहाके, प्रभारी जिल्हाधिकारी एल.जी. राऊत, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार पाटील उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पर्जन्यमान कमी असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने टंचाई आराखडा तयार करावा, असे आदेश देऊन तात्पुरत्या टंचाई निधी वाशिमसाठी तत्काळ देण्याबाबत प्रशासनाला आदेश देण्यात येतील, असेही पवार यांनी सांगितले. वैरण विकासासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत, असे आदेश उपमुख्यमंत्र्यानी यावेळी दिले. वाशिमसाठी यावर्षी वार्षिक सर्व साधारण योजनेसाठी ८५ कोटी रुपये दिले. हवामानावर आधारित पीक विमा योजना राज्यातील ८ जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविली जात असून, असा प्रयोग राज्यात आणि देशातही पहिल्यांदाच होत असल्याचे उप मुख्यमंत्र्यानी यावेळी आवर्जुन सांगितले. अजूनही राज्याच्या काही भागात चांगला पाऊस झाला नाही त्यामुळे अजून पीक विमा मुदत वाढवून मिळावी, अशी विनंती राज्य शासन केंद्र सरकारकडे करणार असल्याचेही उप मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: 97.94 crore assistance to hailstorm affected people in Washim district