संपासाठी झाले ७३.३० टक्के मतदान
By Admin | Updated: May 27, 2017 00:51 IST2017-05-27T00:51:41+5:302017-05-27T00:51:41+5:30
राज्यव्यापी संपाचे हत्यार उगारावे की नाही, या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी शुक्रवार, २६ मे रोजी अकोल्यात ७३.३० टक्के मतदान झाले.

संपासाठी झाले ७३.३० टक्के मतदान
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करून कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी सर्व एसटी कामगार संघटना एकवटल्या असून, राज्यव्यापी संपाचे हत्यार उगारावे की नाही, या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी शुक्रवार, २६ मे रोजी अकोल्यासह राज्यातील सर्व विभागांत मतदान केले गेले. अकोल्यात यासाठी ७३.३० टक्के मतदान झाले.
एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा देऊन सेवाज्येष्ठतेनुसार त्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा. तत्पूर्वी १ एप्रिल २०१६ पासून २५ टक्के अंतरिम वाढ द्यावी, तसेच कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करावी, या प्रमुख मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या सर्व कामगार संघटना एकवटल्या आहेत. त्यासाठी संयुक्त कृती समितीदेखील तयार करण्यात आली आहे. राज्य शासनाने सर्व मागण्यांची त्वरित पूर्तता करावी, या मागणीसाठी २६ व २७ मे रोजी राज्यव्यापी संपाचे हत्यार उगारण्यात येणार आहे. तत्पूर्वी संपाबाबत एसटी कामगारांचे मत जाणून घेण्यासाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया राबविली, अशी माहिती अविनाश जहागीरदार यांनी ‘लोकमत’ला दिली.