तूर, हरभरा डाळीचा सात हजार क्विंटल साठा उपलब्ध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 16:37 IST2020-06-08T16:37:04+5:302020-06-08T16:37:20+5:30
लवकरच जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना रास्तभाव दुकानांमधून मोफत डाळीचे वितरण सुरू करण्यात येणार आहे.

तूर, हरभरा डाळीचा सात हजार क्विंटल साठा उपलब्ध!
अकोला : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी प्रतिमहा प्रतिशिधापत्रिका एक किलो प्रमाणे तूर किंवा हरभरा यापैकी एका डाळीचे मोफत वितरण करण्यासाठी ६ हजार ९२० क्विंटल तूर व हरभरा डाळीचा साठा उपलब्ध झाला आहे. लवकरच जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना रास्तभाव दुकानांमधून मोफत डाळीचे वितरण सुरू करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजना अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रतिमहा प्रत्येक लाभार्थीला पाच किलो मोफत तांदळाचे वितरण करण्यात येत आहे. यासोबतच प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रतिमहा अतिशिधापत्रिका एक किलो तूर किंवा हरभरा यापैकी एका डाळीचे मोफत वितरण करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना गाडीचे मोफत वितरण करण्यासाठी ७ जूनपर्यंत ६ हजार ९२० क्विंटल हरभरा व तूर डाळीचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे एप्रिल ते जून या तीन महिन्यातील मोफत डाळीचे वितरण जिल्हा पुरवठा विभागामार्फत लवकरच जिल्ह्यातील रास्तभाव दुकानांमधून सुरू करण्यात येणार आहे.
उपलब्ध झालेला
असा आहे डाळीचा साठा !
हरभरा डाळ : ५५५० क्विंटल
तूर डाळ : १३७० क्विंटल
दोन महिन्यातील तूर डाळीचा साठा प्रलंबित !
जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना मोफत डाळीचे वितरण करण्यासाठी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी ५ हजार ५५० क्विंटल हरभरा डाळीचा साठा उपलब्ध झाला असला तरी , एप्रिल महिन्यातील १ हजार ३७० क्विंटल तूर डाळीचा साठा उपलब्ध झाला असून , उर्वरित मे व जून या दोन महिन्यांचा तूर डाळीचा साठा प्राप्त होणे अद्याप प्रलंबित आहे.
जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना मोफत डाळीचे वितरण करण्यासाठी आतापर्यंत ६ हजार ९२० क्विंटल हरभरा व तूर डाळीचा साठा उपलब्ध झाला असून, लवकरच रास्तभाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना मोफत डाळीचे वितरण सुरू करण्यात येणार आहे.
-बी.यू. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी.