७ हजार ३४0 जागांसाठी प्रवेश!
By Admin | Updated: May 23, 2017 01:15 IST2017-05-23T01:15:45+5:302017-05-23T01:15:45+5:30
५२ विज्ञान महाविद्यालयांचा समावेश: शिक्षण शुल्काची माहिती देण्याचे आदेश

७ हजार ३४0 जागांसाठी प्रवेश!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविण्यात येणार आहे. विज्ञान शाखा असलेल्या ५२ कनिष्ठ महाविद्यालयांमधील ७ हजार ३४0 जागांसाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे निश्चित झाले असून, त्यासंबंधीची नियमावली तयार करण्याचे काम शिक्षण विभागामार्फत सुरू आहे. शहरातील ५२ कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या शिक्षण शुल्काची माहिती देण्याचे आदेश शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिले आहेत.
शहरात यंदा प्रथमच केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने, माध्यमिक शिक्षण विभाग कामाला लागला आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये दरवर्षी प्रवेशासाठी झुंबड उडते. त्यासाठी विद्यार्थ्यांची टक्केवारी बघितली जात होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना कमी टक्केवारीमुळे पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यापासून वंचित राहावे लागत होते. तसेच कनिष्ठ महाविद्यालयाकडून विद्यार्थी व पालकांकडून मोठ्या प्रमाणात डोनेशनसुद्धा उकळल्या जात होते; परंतु आता याला ब्रेक बसणार असल्याने कनिष्ठ महाविद्यालय संचालकांनी केंद्रीय प्रवेश पद्धतीला विरोध दर्शविला आहे; परंतु शिक्षण विभागाने कोणत्याही परिस्थितीत केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाने शहरातील विज्ञान शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयांकडून आकारण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्काची माहिती मागविली आहे. यासोबतच बायोफोकल, द्विलक्षी अभ्यासक्रम, जनरल सायन्स या विषयांचीसुद्धा माहिती मागविली आहे. केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी समिती गठित करण्यात येणार असून, त्याचे काम सुरू आहे.
प्रवेशासाठी कॉम्पुटर सेंटरची निवड होणार
अकरावीची केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे शिक्षण विभागाने निश्चित केले असून, ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शहरातील पाच ते सहा कॉम्पुटर सेंटरची निवड करण्यात येणार आहे. येथून प्रवेश अर्जांची विक्री करण्यात येईल आणि या ठिकाणीच विद्यार्थ्यांनी आॅनलाइन प्रवेश अर्ज करावे. त्यासाठी शुल्क आकारण्यात येईल. अद्याप कॉम्पुटर सेंटर आणि प्रवेश अर्ज शुल्क निश्चित करायचे आहेत.
महाविद्यालयांसाठी राहील मॅनेजमेंट कोटा
केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आल्यानंतर २0 टक्के जागा महाविद्यालयातील मॅनेजमेंट कोट्यासाठी सोडण्यात येण्याची शक्यता आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला कनिष्ठ महाविद्यालयांचा विरोध लक्षात घेता, शिक्षण विभाग कनिष्ठ महाविद्यालयांसाठी काही जागा सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.