महिनाभरापासून ६४ गावांना मिळाले नाही पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 12:41 IST2019-04-16T12:41:22+5:302019-04-16T12:41:41+5:30
अकोला : ६४ गावांचा पाणी पुरवठा गत महिनाभरापासून बंद असल्याने, जीवाची लाही-लाही करणाऱ्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.

महिनाभरापासून ६४ गावांना मिळाले नाही पाणी
- संतोष येलकर
अकोला : जिल्ह्यात खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणी पुरवठा गत महिनाभरापासून बंद असल्याने, जीवाची लाही-लाही करणाऱ्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पुढारी आणि अधिकारी व्यस्त असल्याने, ६४ खेड्यातील पाणी प्रश्नाकडे कानाडोळा करण्यात येत आहे.
खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून खांबोराजवळील उन्नई बंधाºयात पाणी सोडण्यात येते; परंतु पाणीसाठा उपलब्ध असला तरी पाणी पुरवठा करण्यासाठी खांबोरा येथील पाणी उचल करण्याचे पंप गत २४ मार्च रोजी नादुरस्त झाल्याने, योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे योजनेंतर्गत गावांना गत महिनाभरापासून पिण्याचे पाणी मिळाले नाही. जिवाची लाही-लाही करणाºया उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून, पुढारी आणि प्रशासनातील संबंधित अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने ६४ खेड्यातील पाणी प्रश्नाकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचे वास्तव आहे.
पाणी विकत घेऊन भागविली जाते तहान !
खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत महिनाभरापासून पाणी पुरवठा बंद असल्याने, योजनेंतर्गत गावातील ग्रामस्थांना १०० रुपये प्रती कोठी प्रमाणे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.
गरिबांची ‘झिऱ्यां’वर धाव !
महिनाभरापासून गावातील नळांना पाणी आले नसल्याने, ६४ गावांमधील काही ग्रामस्थ पाणी विकत घेऊन तहान भागवित आहेत; मात्र ज्यांना पाणी विकत घेऊन तहान भागविणे परवडणारे नाही, अशा गरीब ग्रामस्थांना तहान भागविण्यासाठी नदी-नाल्यातील ‘झिºयां’वर धाव घ्यावी लागत आहे. हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी महिला-पुरुषांना दोन-तीन तास झिºयांवर ताटकळत बसावे लागत आहे.
खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत गावांना महिनाभरापासून पिण्याचे पाणी मिळाले नाही, त्यामुळे पाणी विकत घेऊन ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे., तर पाणी विकत घेणे ज्यांना शक्य नाही, अशा गरीब ग्रामस्थांना झिºयातील पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने ६४ गावांना कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्याची उपाययोजना करणे गरजेचे आहे.
-दिलीप मोहोड
सरपंच, आखतवाडा तथा
अध्यक्ष, बारुला विभाग कृती समिती.
पाणी उचल करण्याचे पंप नादुरुस्त झाल्याने गत २४ मार्चपासून खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत गावांचा पाणी पुरवठा बंद आहे. पंप दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, मंगळवारपासून गावांना पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार आहे.
-अनिल चव्हाण
शाखा अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, अकोला.