अकोला जिल्ह्यातील शाळांमधील ५४५ वर्ग खोल्या शिकस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 05:02 PM2019-06-18T17:02:48+5:302019-06-18T17:04:05+5:30

जिल्ह्यातील शाळांमधील ५४५ वर्गखोल्या शिकस्त झाल्या आहेत.

545 rooms of schools in Akola district in bad condition | अकोला जिल्ह्यातील शाळांमधील ५४५ वर्ग खोल्या शिकस्त

अकोला जिल्ह्यातील शाळांमधील ५४५ वर्ग खोल्या शिकस्त

Next

- नितीन गव्हाळे

अकोला: शिक्षण हक्क कायद्यामध्ये प्रत्येक मुलाला मोफत व दर्जेदार शिक्षणाचा अधिकार आहे. प्रत्येक गावामध्ये शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे हे शासनाचे धोरण आहे; परंतु शासनानचे हेच धोरण, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जीवावर उठले आहेत. जिल्ह्यातील शाळांमधील ५४५ वर्गखोल्या शिकस्त झाल्या आहेत. आठवडाभरापूर्वी जिल्ह्यातील अनेक भागात आलेल्या पाऊस व वादळ वाऱ्यामुळे बºयाच जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या छतावरील टीनपत्रे उडून गेले तर कुठे कवेलू फुटले. जीव मुठीत घेऊन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिकस्त झालेल्या वर्गखोल्यांमध्ये सांगा कसं शिकायचं...? अशी भावनिक सादच विद्यार्थ्यांनी घातली आहे.
जिल्ह्यात एकूण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिकच्या एकूण ९७२ शाळा आहेत. या प्राथमिक शाळा सर्वाधिक ९१५ आहेत. या शाळांमध्ये एकूण २ लाख ३९ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार व मोफत शिक्षणाचा अधिकार शासनाने उपलब्ध करून दिला असला तरी, जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिकेच्या शाळांमधील दर्जेदार शिक्षण तर सोडाच, मूलभूत सुविधासुद्धा विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यात येत नाहीत. मोफत व दर्जेदार शिक्षणाचा अधिकार केवळ कागदावरच असल्याचे दिसून येते. शाळांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांना मजबूत इमारत, उत्कृष्ट वर्गखोल्या, शौचालये, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रशस्त क्रीडांगण आदी मूलभूत सुविधा मिळायला हव्यात; परंतु या सर्व सुविधांपासून विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकसुद्धा वंचित आहेत. जिल्ह्यातील अनेक शाळा ब्रिटिशकालीन काळातील आहेत. सद्यस्थितीत या शाळांच्या इमारतींची दयनीय अवस्था झाली असून, या शाळांच्या भिंतीना तडे गेले आहेत. छतावरील टिनपत्रे उडून गेली आहेत. छतावरचे कवेलू तर केव्हाच फुटून गेले आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर शाळांमधील वर्गखोल्यांमध्ये अक्षरश: पावसाचे पाणी गळायला लागते. वादळ वारा आला की, छतावरचे टिनपत्रे उडून जातात. कवेलू फुटतात. अशा परिस्थितीत शिकस्त झालेल्या वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. जिल्ह्यातील ९१५ शाळांमधील ५४५ वर्गखोल्या शिकस्त झाल्या आहेत. या शिकस्त झालेल्या वर्गखोल्यांपैकी १0७ वर्गखोल्या पाडण्यासंदर्भात बांधकाम विभागाने जिल्हा परिषद प्रशासनासोबतच शिक्षण विभागाला सूचना दिल्या आहेत. आठ दिवसांनी शाळांमध्ये घंटा वाजणार आहे. असे असतानाही जिल्हा परिषद प्राथमिक विभागाने शिकस्त झालेल्या वर्गखोल्यांची दुरुस्ती तर केलीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिकायचे कुठे आणि शिक्षकांनी शिकवायचे कुठे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


१0७ वर्गखोल्या पाडण्याच्या सूचना
जिल्ह्यातील शाळांमधील ५४५ वर्गखोल्या शिकस्त झाल्या आहेत. त्यापैकी १0७ वर्गखोल्या तर अत्यंत धोकादायक बनल्या आहेत. या वर्गखोल्या कधीही कोसळू शकतात. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने शाळांचा सर्र्व्हे करून या धोकादायक वर्गखोल्या पाडून टाकण्याच्या सूचना शिक्षण विभागाला केल्या आहेत; परंतु अद्यापपर्यंत शिक्षण विभागाने त्यावर कोणताही निर्णय न घेतल्याची माहिती आहे.

१२५ शाळांची दुरुस्ती!
जिल्हा परिषदेने १४ व्या वित्त आयोगांच्या निधीतून जिल्ह्यातील जवळपास १२५ शाळांमधील वर्गखोल्यांची दुरुस्ती केल्याची माहिती प्राप्त झाली आहे; परंतु जिल्ह्यातील अनके जिल्हा परिषद शाळांमधील छतावरील टिनपत्रे, कवेलू दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे शाळांना दुरुस्तीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 

Web Title: 545 rooms of schools in Akola district in bad condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.