अनुकंपा पदभरतीत ४२ उमेदवारांची निवड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:16 IST2021-02-05T06:16:28+5:302021-02-05T06:16:28+5:30
अकोला : जिल्हा परिषदेच्या अनुकंपा पदभरती प्रक्रियेत ४२ उमेदवारांची निवड करण्यात आली असून, निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना १ फेब्रुवारी ...

अनुकंपा पदभरतीत ४२ उमेदवारांची निवड!
अकोला : जिल्हा परिषदेच्या अनुकंपा पदभरती प्रक्रियेत ४२ उमेदवारांची निवड करण्यात आली असून, निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना १ फेब्रुवारी रोजी समुपदेशनाद्वारे नियुक्त्यांचे आदेश देण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असताना विविध कारणांमुळे मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर ज्येष्ठता यादीनुसार जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदांवर नियुक्ती दिली जाते. त्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त असलेल्या पदांपैकी दहा टक्के रिक्त पदांवर अनुकंपा उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद अंतर्गत १६९ अनुकंपा उमेदवारांची यादी असून, त्यापैकी ४२ उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि ज्येष्ठता यादीनुसार रिक्त पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. कादपत्रांची तपासणी पूर्ण केल्यानंतर अनुकंपा पदभरती प्रक्रियेत जिल्हा परिषद प्रशासनामार्फत ४२ उमेदवारांची निवड करण्यात आली असून, निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी १५ जानेवारीला जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदांवर निवड करण्यात आलेल्या ४२ उमेदवारांना १ फेब्रुवारी रोजी समुपदेशनाद्वारे नियुक्त्यांचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनामार्फत देण्यात येणार आहेत.
‘या’ रिक्त पदांवर देण्यात येणार नियुक्त्या!
जिल्हा परिषद अंतर्गत अनुकंपा पदभरती प्रक्रियेत निवड करण्यात आलेल्या ४२ उमेदवारांना रिक्त पदांवर नियुक्त्या देण्यात येणार आहेत. त्यामध्ये कंत्राटी ग्रामसेवक, परिचर, स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, औषध निर्माण अधिकारी, जोडारी (वेल्डर), वरिष्ठ साहाय्यक (लेखा) इत्यादी संवर्गात रिक्त पदांवर अनुकंपा उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.