अकोला विभागातील ४१९ बसगाड्यांना लवकरच 'जीपीएस सिस्टीम'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 12:56 IST2019-05-13T12:56:36+5:302019-05-13T12:56:42+5:30
अकोला: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागातील ४१९ बसगाड्यांना लवकरच जीपीएस (ग्लोबल पोजीशन सिस्टीम) जोडल्या जाणार आहे.

अकोला विभागातील ४१९ बसगाड्यांना लवकरच 'जीपीएस सिस्टीम'
- संजय खांडेकर
अकोला: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागातील ४१९ बसगाड्यांना लवकरच जीपीएस (ग्लोबल पोजीशन सिस्टीम) जोडल्या जाणार आहे. त्यामुळे एसटी विभागासोबतच प्रवाशांनादेखील या सुविधेचा लाभ मिळणार आहे. मुंबई येथील कंपनीला जीपीएस लावण्याचा कंत्राट देण्यात आला आहे.
राज्याची जीवन वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी गाडी हायटेक करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न गत काही वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. राज्यभरातील बसगाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर मध्यंतरी वाय-फाय सुविधा देण्यात आली. एका कंपनीसोबत करार करून एक विशिष्ट कार्यक्रम प्रवाशांच्या सेवेत होता; मात्र काही अपरिहार्य कारणामुळे वाय-फाय सेवा राज्यभरात बंद पडली. त्यानंतर राज्यातील बसगाड्यांचे लोकेशन घेण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक बसगाडीला जीपीएसने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी नाशिक विभागातून करण्यात आली आहे. येथील दीड हजार बसगाड्या आता आपले लोकेशन देत राज्यात धावत आहेत. त्याच धर्तीवर लवकरच अकोला विभागातील ४१९ बसगाड्यांना जीपीएस जोडले जाणार आहे. ज्या बसगाड्या नव्याने आगारात दाखल होत आहेत, त्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन जीपीएस शिवाय करू नये, असा आदेश परिवहन मंडळाने दिला आहे.
अचून लोकेशन सोबतच मिळेल स्पीडची माहिती
कुठून कुठे धावणारी बस सध्या कोणत्या स्थानकावर आहे, त्या बसगाडीची सध्या स्पीड किती आहे आणि आपल्याला हव्या असलेल्या स्थानकावर ही गाडी केव्हा पोहोचेल, याची अचूक माहिती आता प्रवाशांना मिळणे शक्य होणार आहे. अकोल्यातील दोन आगारांसोबतच, अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, वाशिम, कारंजा, मानोरा, रिसोड या ९ आगारातील एकूण ४१९ बसगाड्यांना जीपीएस लागणार आहे.