४ लाख १६ हजार हेक्टरवरील पिके बाधित
By Admin | Updated: November 21, 2014 02:16 IST2014-11-21T02:16:35+5:302014-11-21T02:16:35+5:30
दुष्काळी परिस्थिती: जिल्हाधिकार्यांनी अहवाल पाठविला शासनाकडे

४ लाख १६ हजार हेक्टरवरील पिके बाधित
अकोला: यावर्षीच्या पावसाळय़ात अल्प पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा अहवाल जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी गुरुवारी शासनाकडे पाठविला आहे. या अहवालानुसार खरीप हंगामात जिल्ह्यात तब्बल ४ लाख १६ हजार ७८६ हेक्टरवरील पिके बाधित झाल्याची बाब समोर आली आहे.
यावर्षीच्या पावसाळय़ात उशिरा आलेला पाऊस आणि अल्प पावसामुळे जिल्ह्यात खरीप हंगामात मूग, उडिदाचे पीक शेतकर्यांच्या हातून गेले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही प्रचंड घट झाली. पिकांचे उत्पादन बुडाल्याने, शेतकरी हवालदिल झाला. जिल्हाधिकार्यांकडून गेल्या शनिवारीच जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यातील सर्वच गावांची सरासरी पैसेवारी ४१ पैसे म्हणजेच ५0 पैशांच्या आत आहे. त्यामुळे जिल्हय़ातील दुष्काळी परिस्थितीचे वास्तव समोर आले. पैसेवारी कमी असल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश शासनामार्फत जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांच्या तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा अहवाल जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी गुरुवारी शासनाकडे पाठविला. या अहवालानुसार २0१४ च्या खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण ४ लाख १८ हजार ९१४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली. त्यापैकी तब्बल ४ लाख १६ हजार ७९६ हेक्टर ५५ आर क्षेत्रावरील पिकांचे क्षेत्र बाधित झाले. त्यामध्ये जिरायती व बागायती आणि बहुवार्षिक फळपिकांच्या क्षेत्राचा समावेश आहे. दुष्काळी परिस्थितीत लाखो हेक्टरवरील पिके हातून गेल्याने, जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारकांसह २ लाख ९७ हजार २२१ शेतकर्यांना फटका बसला. नापिकीमुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडल्याचे चित्र आहे.