बारमाही रस्त्यांची ३७ गावे ‘अवघड’

By Admin | Updated: May 26, 2017 03:06 IST2017-05-26T03:06:56+5:302017-05-26T03:06:56+5:30

मुख्यालयाचे अंतरही वादग्रस्त : बसफेरी नाही म्हणून ठरविले ‘अवघड’

37 villages of perennial roads are 'difficult' | बारमाही रस्त्यांची ३७ गावे ‘अवघड’

बारमाही रस्त्यांची ३७ गावे ‘अवघड’

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील काही अपवाद वगळले, तर सर्वच गावे बारमाही रस्त्यांनी जोडलेली आहेत. विविध कारणांमुळे महामंडळाच्या बसफेऱ्या नसल्याचा आधार घेत जिल्ह्यातील ९३ पैकी ३७ गावे शिक्षकांना सेवा देण्यासाठी अवघड असल्याचे शिक्षण विभागाने ठरविले आहे. त्यातच मुख्यालयापासून ३० ते ४५ कि.मी. अंतरावर असलेल्या गावांचाही समावेश केल्याने शासन निर्णयातील अवघड क्षेत्र ठरविण्याच्या निकषावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
शासनाने जिल्ह्यांतर्गत बदल्यांसंदर्भात १५ मे २०१४ रोजी दिलेल्या आदेशातून शिक्षकांना वगळले. त्यांच्यासाठी २७ फेब्रुवारी २०१७ रोजीच्या निर्णयानुसार नव्याने धोरण निश्चित केले. त्यामध्ये शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्र ठरविण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली. त्यानुसार अकोला जिल्ह्यात ९३ गावे अवघड असल्याचे जाहीर करण्यात आले; मात्र त्यामध्ये घेतलेल्या निकषाचा आधार पाहता शासन निर्णयातील निकषच कसे तकलादू आहेत, हेच निष्पन्न होत आहे.

खासगी वाहनांची रीघ, तरीही दळणवळणास अवघड गावे
जिल्हा परिषदेने अवघड ठरविलेल्या ९१ गावांतील शाळांचा समावेश आहे. त्यापैकी ३७ गावांना बारमाही पक्के रस्ते आहेत. तेथे केवळ महामंडळाची बस जात नाही, या निकषावरून ती अवघड ठरली आहेत. वास्तविकपणे त्या गावांमध्ये खासगी वाहनांची रीघ असते, तर काही गावे आंतरजिल्हा मार्गावर असतानाही केवळ मुख्यालयापासून अधिक अंतर असल्याने अवघड यादीत टाकण्यात आली. त्यामुळे बदली धोरणातील निकषच कसे तकलादू ठरत आहेत, याचा उत्तम नमुना त्यातून पुढे आला आहे.

महामंडळाची बसफेरी नसलेली गावे
पातूर तालुक्यातील गावे मुख्यालयापासूनचे अंतर आणि महामंडळाची बसफेरी नसल्याच्या कारणावरून अवघड ठरली आहेत. त्यापैकी काही गावे अकोला-मेहकर या आंतरजिल्हा मार्गावर वाहनांची सातत्याने वर्दळ असलेली आहेत. त्यामध्ये अडगाव, राहेर, पिंपरडोळी, चोंढी घाटमाळ, निर्गुणा प्रकल्प, गोळेगाव, पाचरण, वनदेव, वसाली, सावरगाव, झरंडी, पांगरताटी, वहाळा, पळसखेड, बेलतळा, दोधाणी, कोसगाव, सोनुना, पांढुर्णा, चारमोळी, सांगोळा, रामनगर, खापरखेडा, अंधारसांगवी, शेकापूर या गावांचा समावेश आहे.

अवघड क्षेत्र ठरविण्याचे निकष
अवघड क्षेत्रातील गाव ठरविण्यासाठी सर्वसाधारणपणे जे गाव तालुक्याच्या मुख्यालयापासून दूर आहे. दळणवळाच्या दृष्टीने त्या शाळेत अथवा गावात पोहोचण्यासाठी सोयी-सुविधा नाहीत. दुर्गम, डोंगराळ भागातील गावे, काम करण्यास प्रतिकूल परिस्थिती असलेली गावे, असे निकष आहेत.

मुख्यालयाच्या निकषातून अवघड ठरलेली सोपी गावे
- मुख्यालयापासून अंतराचा निकष लावून अवघड असलेली गावे प्रत्यक्षात किती सोपी आहेत, याची उदाहरणेही आहेत. त्यामध्ये अकोला तालुक्यातील सागवी बु., वाकी, वाळकी, लाखोंडा बु., बाळापूर तालुक्यातील मांजरी, मालवाडा ही गावे अकोला शहरातून जवळ, तर तालुक्याच्या ठिकाणाहून लांब आहेत.
- धाडी-बल्हाडी गावाला बारमाही रस्ता आहे. काही गावे केवळ केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांच्या आग्रहाने ठरली आहेत.

Web Title: 37 villages of perennial roads are 'difficult'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.