गारठल्याने दगावली ३0 गुरे
By Admin | Updated: July 26, 2014 21:00 IST2014-07-26T21:00:42+5:302014-07-26T21:00:42+5:30
संततधार पावसामुळे गारठल्याने सिसा उदेगाव व मासा येथील ३0 गुरे दगावली.

गारठल्याने दगावली ३0 गुरे
डोंगरगाव मासा: गत दोन दिवस आलेल्या संततधार पावसामुळे गारठल्याने सिसा उदेगाव व मासा येथील ३0 गुरे दगावली. यामुळे संबंधित शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. चाराटंचाईमुळे अशक्त झालेल्या गुरांना दोन दिवसांचे थंड वातावरण बाधक ठरल्यानेच ती दगावल्याचे पशुवैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले असून, या घटनेमुळे पशुपालक शेतकर्यांत भीतीचे वातावरण आहे. यंदा पावसाला बराच विलंब झाला. पावसाअभावी चाराटंचाई निर्माण होऊन गुरे अशक्त झाली. त्यातच बर्याच दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दोन दिवस मुक्काम ठोकला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. अशक्त गुरांना वातावरणातील गारवा झोंबल्याने सिसा, मासा परिसरात गाय, बैलांसह ३0 गुरे दगावली. गुरांना चारापाणी वेळेवर देण्याचा सल्ला बाभुळगाव येथील शासकीय पशुवैद्यकीय अधिकार्यांनी दिला असून, परिसरात गुरांसाठी लसीकरण मोहीम राबवून गुरे दगावण्याच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.