दक्षिण झाेनमध्ये २६ डुकरांचा मृत्यू;मनपा झाेपेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:18 IST2021-01-23T04:18:21+5:302021-01-23T04:18:21+5:30
शहरातील मूलभूत साेयीसुविधांचा पुरता फज्जा उडाला आहे. घाणीने तुडुंब साचलेल्या नाल्या,गटारे, धुळीने माखलेले रस्ते, ठिकठिकाणी साचलेला कचरा असे चित्र ...

दक्षिण झाेनमध्ये २६ डुकरांचा मृत्यू;मनपा झाेपेत
शहरातील मूलभूत साेयीसुविधांचा पुरता फज्जा उडाला आहे. घाणीने तुडुंब साचलेल्या नाल्या,गटारे, धुळीने माखलेले रस्ते, ठिकठिकाणी साचलेला कचरा असे चित्र अकाेलेकरांसाठी किळसवाणे ठरत आहे. प्रभागांमध्ये तुंबलेल्या सांडपाण्याची समस्या निकाली काढली जात नसल्याने मनपातील स्वच्छता व आराेग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अशा परिस्थितीत दक्षिण झाेनमधील प्रभाग क्रमांक १९ मध्ये काही दिवसांपासून डुकरांचा मृत्यू हाेत असल्याचे समाेर आले आहे. मागील सहा ते सात दिवसांमध्ये या भागात सुमारे २६ डुकरांचा मृत्यू झाला असून या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. खुल्या जागा, तुंबलेल्या सांडपाण्यात वराह मृतावस्थेत आढळून येत असून त्यांची मनपाकडून तातडीने विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. प्रशासनासाेबतच सत्तापक्षाकडून या प्रकाराची दखल घेतली जात नसल्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
नागरिकांमध्ये भीती
काही दिवसांपासून पक्षांमधील ‘बर्ड फ्लू’च्या साथीने सर्वत्र हाहाकार उडाला आहे. अशा स्थितीत डुकरांचे मृत्यू हाेत असल्यामुळे दक्षिण झाेन मधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अचानक इतक्या माेठ्या संख्येने डुकरांचा मृत्यू का हाेत आहे, याचा महापालिका प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी हाेत आहे.