१८७२ जागांसाठी २४ हजार अर्ज
By Admin | Updated: July 26, 2014 22:56 IST2014-07-26T22:56:20+5:302014-07-26T22:56:20+5:30
आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू : अनेक विद्यार्थी राहणार वंचित

१८७२ जागांसाठी २४ हजार अर्ज
बुलडाणा: यावर्षी दहाविमध्ये मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थी पास झाल्यामुळे सुरूवातीपासूनच महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी प्रचंड स्पर्धा निर्माण झाली होती. त्यामुळे आयटीआयकडे सुध्दा विद्यार्थ्यांचा ओढा दरवर्षीच्या प्रमाणात अधिक आहे. अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत उपलब्ध असलेल्या विविध ट्रेडच्या जागा पेक्षा हजारो अर्ज प्राप्त झाल्याने जागे अभावी शेकडो विद्यार्थी प्रवेशा पासून वंचित राहणार आहेत. अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यात औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत १८७२ जागा असून त्यासाठी २४ हजार विद्यार्थ्यांंनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. २८ जुलै पासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे.
ईयत्ता दहावीचे निकाल लागल्या नंतर आयटीआय प्रवेश प्रक्रिया प्रत्यक्षात १0 जुलैपासून सुरु करण्यात आली. त्या नंतर ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता विद्यार्थ्यांची एकच धावपळ सुरू झाली होती. साधरण ग्रामीण भागातील आर्ट आणि कॉर्मसच्या विद्यार्थ्यांचा ओढा आयटीआय कडे अधिक असतो. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जिल्ह्याभरातील विद्यार्थ्यांंनी मलकापूर रोड वरील औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत एकच गर्दी केली होती. तर शहरातील अन्य संगणकीय केंद्रावर विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती. बुलडाणा जिल्ह्यात आयटीआय प्रवेशाकरिता ५६४ एवढी विद्यार्थ्यांची क्षमता असून १४ व्यवसायासाठी विविध ट्रेडमध्ये विद्यार्थ्यांंना प्रवेश देण्यात येते. मात्र यावर्षी क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आयटीआयकडे प्राप्त झाल्याने यामधील काही विद्यार्थ्यांना प्रवेशा पासून वंचित राहावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. खासगी क्षेत्रामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांना अधिक पैसे मोजावे लागतात. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांची शासकीय संस्थेमध्ये प्रवेश मिळविण्याकरिता धाव घेतात. मात्र यंदा विद्यार्थी संख्या अधिक असल्याचे दिसून येते. येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये १ आणि २ वर्षाच्या कोर्ससाठी १४ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. जिल्ह्यात नेमक्या ५६४ जागा असताना ६ हजार ५७७ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून नुकतीच गुणवत्ता यादी लावण्यात आली आहे. बुलडाणा येथील प्रशिक्षण संस्थेत १ हजार प्रवेश निश्चित झाले आहेत. अकोला जिल्ह्यात विविध ट्रेडसाठी १८७२ जागा आहेत. मात्र येथे सुध्दा १0 हजार विद्यार्थ्यांंचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती आहे. तर वशिम जिल्ह्यात ३७0 जागा असताना येथे जवळपास ८ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. जागा कमी व अर्ज मोठय़ा प्रमाणावर प्राप्त झाल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांंना प्रवेशापासुन वंचित राहावे लागणार आहे.