अतिवृष्टीचा तडाखा : १२४ घरांची पडझड; तीन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 13:10 IST2018-08-19T13:02:42+5:302018-08-19T13:10:01+5:30
अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील दोन तालुक्यात १२४ घरांची पडझड झाली असून, चार तालुक्यांमध्ये २ हजार ९१२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शनिवारी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला.

अतिवृष्टीचा तडाखा : १२४ घरांची पडझड; तीन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान!
अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील दोन तालुक्यात १२४ घरांची पडझड झाली असून, चार तालुक्यांमध्ये २ हजार ९१२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शनिवारी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला.
गत पंधरा दिवसांच्या कालावधीत पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील खरीप पिके पावसाअभावी धोक्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांकडून सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात असतानाच १६ आॅगस्ट रोजी रात्रीपासून १७ आॅगस्ट सकाळपर्यंत जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला. त्यामध्ये जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, पातूर व मूर्तिजापूर या चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. जोरदार पाऊस बरसल्याने १७ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात पूर्णा, मोर्णा, काटेपूर्णा, निर्गुणा, उमा यासह इतर नद्या व नाल्यांना पूर आला. दमदार पाऊस बरसल्याने पावसाअभावी धोक्यात आलेल्या पिकांना संजीवनी मिळाली असली, तरी अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील तेल्हारा व मूर्तिजापूर या दोन तालुक्यांत १२४ घरांची पडझड झाली. तसेच अकोला, बार्शीटाकळी, बाळापूर व मूर्तिजापूर या चार तालुक्यांमध्ये २ हजार ९१२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. नुकसानाचा प्राथमिक अहवाल शनिवार, १८ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला.
घरांचे असे झाले नुकसान!
तालुका घरे
मूर्तिजापूर ११७
तेल्हारा ०७
...............................
एकूण १२४
जमीन खरडून गेल्याने नुकसान!
अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतजमीन खरडून गेल्याने नुकसान झाले आहे. जमीन खरडून गेल्याने नुकसान झाल्याबाबत शेतकºयांचे अर्ज शनिवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त होत आहेत.