२१ उमेदवारांचे अर्ज अवैध
By Admin | Updated: September 30, 2014 01:54 IST2014-09-30T01:54:02+5:302014-09-30T01:54:02+5:30
अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघात १६३ उमेदवारांचे २१६ अर्ज ठरले वैध.

२१ उमेदवारांचे अर्ज अवैध
अकोला: विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी सोमवार, २९ सप्टेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या कार्यालयात करण्यात आली. या छाननी प्रक्रियेत २१ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असून, एकूण पाच मतदारसंघात १६३ उमेदवारांचे २१६ अर्ज वैध ठरविण्यात आले.
विधानसभा निवडणुकीसाठी २0 ते २७ सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात एकूण १८५ उमेदवारांकडून २५८ उमेदवारी दाखल करण्यात आले होते. या अर्जांची छाननी सोमवारी करण्यात आली. छाननीत एकूण २१ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरलेत. पक्षाचा एबी फॉर्म सादर न करणे आणि प्रस्तावकांची आवश्यक तेवढी नावे न देणे इत्यादी कारणांमुळे २१ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. यामध्ये अकोला पूर्व मतदारसंघातून ४, अकोला पश्चिम मतदारसंघातून ४, आकोट मतदारसंघातून २, बाळापूर मतदारसंघातून ७ आणि मूर्तिजापूर मतदारसंघातून ४ उमेदवारांचा समावेश आहे. पाचही मतदारसंघातून एकूण ३९ उमेदवारी अर्ज अवैध ठरलेत.