नायगाव-तारफैल परिसरातील १७ ‘एलईडी’ पथदिवे पळविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 15:20 IST2018-09-16T15:20:07+5:302018-09-16T15:20:55+5:30
अकोला : महापालिका कार्यक्षेत्रात येत असलेल्या नायगाव, भवानीपेठ चौक, तारफैल परिसरातील १७ एलईडी लाइट पळविल्याची घटना उजेडात आली.

नायगाव-तारफैल परिसरातील १७ ‘एलईडी’ पथदिवे पळविले!
अकोला : महापालिका कार्यक्षेत्रात येत असलेल्या नायगाव, भवानीपेठ चौक, तारफैल परिसरातील १७ एलईडी लाइट पळविल्याची घटना उजेडात आली. प्रभाग क्रमांक सातमधील काँग्रेसचे नगरसेवक मोहम्मद इरफान अब्दुल रहेमान यांनी याप्रकरणी मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांच्याकडे तक्रार केली आहे. आता मनपा आयुक्त या तक्रारीची काय दखल घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील भागातील नायगाव रोड ते रेल्वे पुलापर्यंत रोडवरील १३ एलईडी लाइट आणि भवानी चौक ते तारफैल येथील मार्गावरील चार असे एकूण १७ एलईडी लाइट अज्ञातांनी पळविले. त्यामुळे परिसरातील लोकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. दीड महिन्यापासून असुविधा असल्याची तक्रार नगरसेवक इरफान यांनी अनेकदा कंत्राटदार, महापालिका प्रशासनाकडे केली; मात्र अद्याप त्याची साधी दखलही घेण्यात आली नाही. खांबावर चढून एलईडी काढणारी एक मोठी टोळी परिसरात सक्रिय असण्याची दाट शक्यता यावरून दिसून येत आहे. मनपा आयुक्त आता याप्रकरणी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.