अकोला जिल्ह्यात १६२ मध्यम, ४३ तीव्र श्रेणीची कुपोषित बालके !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 13:26 IST2020-08-20T13:26:44+5:302020-08-20T13:26:54+5:30
जिल्ह्यात १६२ मध्यम, तर ४३ तीव्र श्रेणीतील कुपोषित बालकांची नोंद करण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्यात १६२ मध्यम, ४३ तीव्र श्रेणीची कुपोषित बालके !
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचे स्वप्न बघितले जात असले, तरी कमी अधिक प्रमाणात जिल्ह्यात कुपोषित बालके आढळून येत आहेत. जुलै महिन्यात जिल्ह्यात १६२ मध्यम, तर ४३ तीव्र श्रेणीतील कुपोषित बालकांची नोंद करण्यात आली आहे.
कुपोषण मुक्तीसाठी राज्य स्तरावर अंगणवाडीच्या माध्यमातून मुलांना पोषण आहार पुरविल्या जात आहे; मात्र तरीदेखील जिल्ह्यात काही भागात कमी अधिक प्रमाणात कुपोषित मुले आढळून येत आहेत. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात जुलै महिन्यात २०५ मुलं कुपोषित श्रेणीत आढळून आले आहेत. यामध्ये १६२ मुलं मध्यम, तर ४३ मुलं तीव्र कुपोषित श्रेणीतील आहेत. जुलै महिन्याच्या अहवालानुसार, सर्वाधिक कुपोषित बालकांची नोंद अकोला शहर व अकोला ग्रामीणमध्ये करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर, बाळापूर, अकोट, तेल्हारा तहसील येथे कुपोषीत बालक आढळून आले आहे. सरकारकडून योजना राबविल्या जात असल्या तरी त्या प्रभावी ठरत नाहीत.
लॉकडाऊनच्या काळात पोषण आहार पुरविल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी कुपोषणाचा आकडा यामधील फोलपणा स्पष्ट करतो.
अंगणवाड्यांच्या माध्यमातून कुपोषित बालकांपर्यंत पोषण आहार पोहोचविल्या जातो. लॉकडाऊनच्या काळातही मोबाइलच्या माध्यमातून यंत्रणा या बालकांच्या संपर्कात होती.
- विलास मारसाळे, महिला व बाल कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला.