१६ जणांना भारताचे नागरिकत्व; भाजप नेते किरीट साेमय्यांनी दिले पुरावे
By आशीष गावंडे | Updated: February 6, 2025 21:46 IST2025-02-06T21:46:06+5:302025-02-06T21:46:26+5:30
बनावट जन्म दाखले सादर करणाऱ्या १३ जणांविराेधात रामदासपेठ पाेलिसांत गुन्हा दाखल

१६ जणांना भारताचे नागरिकत्व; भाजप नेते किरीट साेमय्यांनी दिले पुरावे
अकाेला: बांगलादेशी नागरिक घुसखोरीच्या मुद्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी रामदासपेठ पाेलिस ठाण्यात १६ जणांची यादी पुराव्यासहित सादर केली. जिल्ह्यात विविध भागात वास्तव्य करणाऱ्या ८० जणांनी गैरमार्गाने जन्म दाखला मिळवून भारताचे नागरिकत्व मिळविल्याचा दावा साेमय्या यांनी यावेळी केला. याप्रकरणी किरीट सोमय्या यांचे बयाण नोंदविण्यात आले. दरम्यान, नायब तहसिलदार यांच्या तक्रारीवरुन बनावट जन्म दाखले सादर करणाऱ्या १३ जणांविराेधात रामदासपेठ पाेलिसांत गुन्हा दाखल करुन तीन जणांना अटक केली आहे.
जन्म व मृत्यू नाेंदणी कायद्यातील सुधारणेनंतर अकाेला जिल्ह्यात उशिरा जन्म प्रमाणपत्रासाठी प्राप्त झालेल्या अर्जांवर भाजप नेते किरीट साेमय्या यांनी आक्षेप घेतला आहे. लाेकसभा निवडणुकीनंतर जन्म व जात प्रमाणपत्रासाठी प्राप्त झालेल्या अर्जांतील नावे बांग्लादेशी व्यक्तींची असल्याचा आराेप साेमय्या यांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी साेमय्या यांनी तक्रार दिली असल्यामुळे बयाण नाेंदविण्यासाठी ते रामदासपेठ पाेलिस ठाण्यात हजर झाले हाेते. यावेळी त्यांनी १६ जणांची यादी पुराव्यासहित शहर पाेलिस उपअधीक्षक सतीष कुलकर्णी,रामदासपेठचे पाेलिस निरीक्षक मनाेज बहुरे यांच्याकडे सादर केली. याप्रकरणी लवकरच फॉरेन्सिक ऑडिटर नेमण्याचा अधिकार पोलिसांना मिळणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
१३ जणांविराेधात गुन्हे दाखल
अकाेला तहसिलच्या नायब तहसिलदार स्वप्नाली काळे यांनी जन्म तारखेत खाेडताेड करुन प्रमाणपत्र मिळविणाऱ्या १२ जणांविराेधात रामदासपेठ पाेलिस ठाण्यात तक्रार नाेंदवली. याप्रकरणी पाेलिसांनी बीएनएस ३१८(४),३३६(२),३३७, ३३६(३),३४०(२),३(५) अन्वये गुन्हा दाखल केला. तसेच मेहबूब खान नाजूल्ला खान, माेहम्मद जुबेर माे.युनूस, अब्दुल जुनेद पटेल अब्दुल बहार पटेल यांना अटक केली. १३ व्या आराेपीचे नाव पाेलिस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आहे.
प्रशासकिय अधिकारी रडारवर
याप्रकरणात सामील असलेल्या तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणार असा, इशारा भाजप नेते साेमय्या यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शाळेतील नोंदी तपासण्याचे काम सुरू झाले आहे. तहसीदारांच्या संमतीशिवाय बनावट दाखले तयार हाेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी याेग्य काम न केल्यास त्यांनाही सोडणार नाही, असा इशारा सोमय्या यांनी दिला.