१२0 कोटींचे उत्पन्न कागदावरच!
By Admin | Updated: January 20, 2016 02:10 IST2016-01-20T02:10:07+5:302016-01-20T02:10:07+5:30
अकोला महापालिकेत मालमत्ता मोजणीची माहिती धूळ खात.

१२0 कोटींचे उत्पन्न कागदावरच!
आशीष गावंडे / अकोला: मालमत्ता कर वसुलीच्या माध्यमातून महापालिकेला १२0 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून देण्याचा गवगवा करणार्या तत्कालीन सहायक आयुक्तांच्या कार्यशैलीमुळे प्रशासनाची कोंडी झाली आहे. मनपाच्या तब्बल ५00 कर्मचार्यांचा फौजफाटा सोबत घेऊन ९0 हजार मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करणार्या संबंधित अधिकार्याने डिसेंबर महिना उजाडेपर्यंत मालमत्ता मोजणीची माहिती संगणकात संकलित करण्यास दिरंगाई केल्याचा फटका प्रशासनाला बसला असून, १२0 कोटींचे उत्पन्न तर सोडाच, आता जुन्या दरानुसार नोटीस जारी करण्याची वेळ प्रशासनावर आली. मनपाच्या मालमत्ता कर विभागामार्फत मार्च महिन्यापर्यंत २८ कोटींची वसुली केली जाणार असून, यामध्ये सहा कोटी रुपयांची थकबाकी आहे. तत्पूर्वी, शहरातील मालमत्तांचे नव्याने पुनर्मूल्यांकन केल्यास मनपाच्या तिजोरीत किमान १२0 कोटींचे उत्पन्न प्राप्त होणार असल्याची सबब समोर करीत मनपाच्या तत्कालीन सहायक आयुक्त माधुरी मडावी यांनी एप्रिल २0१५ मध्ये पुनर्मूल्यांकन मोहिमेला सुरुवात केली. ही मोहीम झोननिहाय पूर्ण करण्यासाठी संबंधित क्षेत्रीय अधिकारी, मालमत्ता विभाग, नगर रचना विभाग, बांधकाम विभागातील कर्मचार्यांसह मनपा शिक्षक व सुरक्षा रक्षक अशा सुमारे ५00 कर्मचार्यांचा समावेश करण्यात आला. टप्प्याटप्प्याने झोननिहाय मोजणी करीत असताना, अर्थातच त्याचवेळी मोजणी केलेल्या मालमत्तांची माहिती संगणकात संकलित करणे अपेक्षित होते. तसे न करता ९0 हजार मालमत्तांचे दस्तावेज एकाच वेळी मनपात जमा करण्यात आले. या कामासाठी चक्क सात महिन्यांचा अवधी लागला.