औरंगाबादेतील डॉक्टरकडून ११ किडनींचे प्रत्यारोपण

By Admin | Updated: January 30, 2016 02:22 IST2016-01-30T02:22:58+5:302016-01-30T02:22:58+5:30

डॉक्टर एजंटच्या भूमिकेत; पुण्यातही प्रत्यारोपण.

11 kidney transplant from Aurangabad doctor | औरंगाबादेतील डॉक्टरकडून ११ किडनींचे प्रत्यारोपण

औरंगाबादेतील डॉक्टरकडून ११ किडनींचे प्रत्यारोपण

सचिन राऊत/ अकोला: आंतरराष्ट्रीय स्तरावर पाळेमुळे असलेल्या व अकोल्यात उघडकीस आलेल्या किडनी तस्करी प्रकरणामध्ये औरंगाबाद येथील एकाच डॉक्टरने किडनी प्रत्यारोपणाच्या ११ शस्त्रक्रिया केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या डॉक्टरने किडनी तस्करी प्रकरणामध्ये एजंटचीच भूमिका निभावल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सदर डॉक्टरच्या मदतीने पुण्यातही किडनी प्रत्यारोपणाच्या पाच शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. जुने शहर तसेच हरिहर पेठेतील रहिवासी संतोष गवळी, संतोष कोल्हटकर, शांताबाई खरात व अमर शिरसाट यांना २0 ते ५0 हजार रुपये कर्ज देऊन त्यांना किडनी दान देण्यासाठी हतबल करणारी टोळी अकोल्यासह राज्यातील प्रत्येक शहरात कार्यरत आहे. या टोळीतीलच काही सदस्यांनी अकोल्यातील या चार जणांच्या किडनीच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार केला; मात्र ठरलेला मोबदला त्यांना न दिल्याने किडनी तस्करी प्रकरणाच्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश झाला. किडनी तस्करी प्रकरणातील खरेदी-विक्रीच्या व्यवहारात यवतमाळ, नागपूर व औरंगाबाद येथील डॉक्टरचा समावेश असल्याचे पोलीस तपासात समोरही आले; परंतु राजकीय दबाव पोलिसांवर असल्याने तसेच तांत्रिक मुद्दय़ांची उकल करण्यासाठी आवश्यक असलेली डॉक्टरांची मदत पाहिजे त्या प्रमाणे होत नसल्याने गुंतागुंतीचा हा तपास थांबलेल्या अवस्थेत आहे. औरंगाबादेतील एका डॉक्टरने तब्बल ११ जणांच्या किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केल्या तर याच डॉक्टरच्या मदतीने पुण्यातही पाच शस्त्रक्रिया करण्यात आल्या. श्रीलंकेमध्येही किडनी प्रत्यारोपणाच्या तीन ते चार शस्त्रक्रिया झाल्या; मात्र अकोला पोलिसांना तपासात र्मयादा असल्याने या प्रकरणातील डॉक्टरांचा चेहरा अद्याप समोर आला नाही. एका डॉक्टरने एजंटची भूमिका बजावल्याचे तपासात समोर आल्यावरही डॉक्टरवर कारवाई करण्यात येत नसल्याचे वास्तव आहे.

Web Title: 11 kidney transplant from Aurangabad doctor