Treatment of wife aging in the seventies; Work all day, stay in the hospital | सत्तरीतले वयोवृद्ध करताहेत पत्नीवर उपचार; दिवसभर काम, हॉस्पिटलमध्येच मुक्काम

सत्तरीतले वयोवृद्ध करताहेत पत्नीवर उपचार; दिवसभर काम, हॉस्पिटलमध्येच मुक्काम

सुदाम देशमुख

अहमदनगर :  ‘तेल आलं संपत तरी, दुसऱ्यासाठी तेवतेय वात, काठीपेक्षा आतला आधार, सांगतो हातामधला हात’ या एका कवितेच्या ओळीची अनुभूती सध्या येथील आनंदऋषीजी रुग्णालयाच्या आवारात मिळते आहे. दोन्ही किडन्या निकामी झाल्याने जगण्याशी लढा देणाऱ्या ६५ वर्षांच्या आजीबाईंनी ‘आता घरी नकोच, जे काही जगायचे आहे, ते रुग्णालयातच जगायचे’ असा ठाम निर्धार केला आहे. त्यांच्या या निर्धाराला वडापावच्या गाडीवर काम करणाऱ्या पतीनेही बळ दिले आहे. ही करुण कहाणी आहे भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या बीड जिल्ह्यातील कमलबाई आणि साहेबराव बटुळे (रा. घोगस पारगाव, ता. शिरूर कासार) या वृद्ध दाम्पत्याची.

कमलबाईंच्या दोन्ही किडन्या अडीच वर्षांपूर्वी निकामी झाल्या. तेव्हापासून त्या नगर येथील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत आहेत. मात्र, गेल्या अडीच महिन्यांपासून त्यांनी रुग्णालयातच आपला मुक्काम कायम केला आहे. कमलबाई यांना तीन मुले, सुना, नातवंडे आहेत. मात्र, त्यांचीही आर्थिक परिस्थिती जेमतेम असून ते सर्व ऊसतोडणीसाठी बाहेरच्या जिल्ह्यात गेलेले आहेत. किडन्या निकामी झाल्याने त्यांना आठवड्यातून एकदा किंवा दोनवेळा डायलिसिस करावे लागते. मात्र, घोगस पारगाव ते अहमदनगर या लांबच्या अंतराचा प्रवास करणे आता अशक्य झाले आहे. त्यांना या जागेवरून उठणेही अवघड आहे.

मुले-नातेवाईक यांच्या मदतीची अपेक्षा न ठेवता स्वत: वडापावच्या गाडीवर काम करतो आहे. अडीच वर्षांपासून रुग्णालयात घरून ये-जा करतो. आता पैसेही नाहीत आणि ताकदही राहिली नाही. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत कामही करणार आणि पत्नीला आधारही देणार आहे.
- साहेबराव गणपत बटुळे

माझ्या खाण्या-पिण्याची, औषधांची व्यवस्था व्हावी म्हणून पती सत्तरीतही राबत आहेत. कोणालाच त्रास नको म्हणून इथेच राहते आहे. इथे रुग्णांच्या नातेवाईंकांचे दु:ख जाणून घेते, त्यांनाही धीर देते. - कमलबाई बटुळे

 

Web Title: Treatment of wife aging in the seventies; Work all day, stay in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.