Thunderstorms; Two grocery stores burst | करंजीत चोरट्यांचा धुमाकूळ; दोन किराणा दुकान फोडले
करंजीत चोरट्यांचा धुमाकूळ; दोन किराणा दुकान फोडले

करंजी : येथे मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. करंजी सोसायटीच्या किराणा दुकानासह आणखी एका किराणा दुकानातून रोख रक्कम व चिल्लर लांबविली. चोरटे सीसीटिव्हीत कैद झाले आहेत. दरम्यान चोरट्यांनी जाताना सीसीटिव्ही कॅमे-याची मोडतोड केली. जैन स्थानकातही चोरीचा प्रयत्न केला. 
 मंगळवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास ५ ते ६ अज्ञात चोरट्यांंनी गावात अक्षरश: धुमाकूळ घातला. सुरूवातीस गावातील अनेक घरांना बाहेरुन धक्के देवून चाचपणी केली. चोरट्यांनी शेतकºयांची कामधेनू असलेल्या करंजी विविध कार्यकारी सोसायटीच्या किराणा दुकानाच्या शटरची पट्टी तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानात काउंटरची उचका-पाचक करून दुकानातील रोख रक्कम १० हजार रुपये रोख व चिल्लर असा ऐवज लांबविला. सोसायटीत सिसीटिव्ही कॅमेरे असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी गजाच्या सहाय्याने कॅमे-यांची तोडफोड केली. त्यानंतर चोरट्यांनी तेथून जवळच असलेल्या सुभाष नामदेव साखरे यांच्या भरवस्तीतील किराणा दुकान फोडले. या दुकानातून रोख रक्कम व चिल्लर लांबविली. भरपेठेत असलेल्या जैन स्थानकाचा दरवाजा उघडून चोरट्यांनी तेथेही चोरीचा प्रयत्न केला. परंतू तेथे फक्त भांडेच असल्याने त्यांच्या हाती काही लागले नाही. पोलिसांनी श्वास पथकालाही पाचारण केले होते. 
करंजी ग्रामस्थ संतप्त 
 करंजी सोसायटीच्या किराणा दुकानात चोरी झाल्याचे समजताच ग्रामस्थ बुधवारी सकाळी सोसायटीपुढे जमा झाले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी पोलीस अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले. करंजी येथील औटपोस्ट शोभेची वास्तू झाली आहे. अनेक दिवसापासून नागरिकांनी मागणी करुनही येथे कायमस्वरूपी पोलिसांनी नेमणूक होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. उत्तरेश्वर मंदिरात झालेल्या बैठकीत पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखे, सहायक पोलीस निरीक्षक परमेश्वर जावळे, सरपंच बाळासाहेब अकोलकर, संस्थेचे अध्यक्ष बंडू अकोलकर, रफिक शेख, विजय अकोलकर, सुभाषराव अकोलकर, भाऊसाहेब क्षेत्रे, सचिव सुभाष अकोलकरसह मोठया संख्येने ग्रामस्थ हजर होते. याबाबत पाथर्डी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 
  करंजीत झालेल्या धाडसी चो-यांचा तपास पोलीस लवकरच लावतील. नागरिकांनी पोलिसांना माहिती देवून सहकार्य करावे, असे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखे यांनी सांगितले.
 

Web Title: Thunderstorms; Two grocery stores burst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.