Thousands of passengers escaped in the direction of the train when the rule was broken; 'That' farmer gave 'Lokmat' information | रूळ तुटल्याचे पाहताच धावलो रेल्वेच्या दिशेने अन् वाचले हजारो प्रवाशांचे प्राण;  ‘त्या’ शेतक-याने दिली ‘लोकमत’ला माहिती
रूळ तुटल्याचे पाहताच धावलो रेल्वेच्या दिशेने अन् वाचले हजारो प्रवाशांचे प्राण;  ‘त्या’ शेतक-याने दिली ‘लोकमत’ला माहिती

लोकमत संवाद/अनिल लगड/ 
अहमदनगर : रुळ तुटल्याचे पाहताच जीवाची कोणतीही पर्वा न करता काही क्षणात मी रेल्वेच्या दिशेने धाव घेतली. रेल्वे चालकाला वाटले हा आत्महत्या करतो की काय? पण रेल्वे जवळ येताच मी रेल्वे ट्रॅकच्या बाजूला उडी घेतली. त्यानंतर क्षणातच रेल्वे थांबली अन् हजारो प्रवाशांचे प्राण वाचले. मलाही याचे मोठे समाधान लाभले,  असे देहरे येथील शेतकरी रामदास बापूराव थोरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
रविवार (दि.१० नोव्हेंबर) सकाळची सात-साडेसात वाजण्याची वेळ होती. मी रेल्वे रूळ ओलांडून माझ्या शेतात पिकाला पाणी भरण्यासाठी चाललो होतो. जाताना मला एका ठिकाणी रेल्वे रूळ तुटलेल्या स्थितीत दिसला. मी काही लोकांना सांगत असतानाच मला रेल्वे धावत येताना दिसली. त्याचक्षणी मी माझ्या अंगातील लाल रंगासारखा दिसणारा बनियन काढला आणि बनियन फडकावत रेल्वेच्या दिशेने पळालो. जवळपास ८०० मीटरपर्यंत पळालो. रेल्वेच्या चालकांनीही मला पाहिले. त्यांना वाटले हा आत्महत्या करतो की काय? त्यांनी रेल्वेचा वेग कमी केला होता. माझ्यात आणि रेल्वेत केवळ २५ ते ३० फुटाचे अंतर राहिले होते. त्याच क्षणात मी माझा जीव वाचविण्यासाठी रेल्वे ट्रॅकवरुन बाजूला उडी मारली. ज्या ठिकाणी मी उडी मारली. त्याठिकाणी असलेल्या काट्या-कुपाट्यात मी पडल्याने माझ्या गुडघ्याला मार लागला. पाय लचकला. मी बाजूला झाल्यानंतर ‘त्या’ रेल्वे चालकाला वाटले हा माणूस आत्महत्या करायला नाही तर काही तरी रेल्वेला धोका आहे, हे सांगत तर नाही ना, अशी शंका आली. त्यामुळे त्या रेल्वे चालकाने रेल्वेचा आणखी वेग कमी केला. त्यानंतर पुढे गेल्यावर लोकांची गर्दी दिसली. त्यामुळे रेल्वे चालकानेही रेल्वे जागेवरच थांबविली. त्यानंतर रेल्वे चालकाला तेथे उभ्या असलेल्या नागरिकांनी रेल्वे रूळ तुटल्याचे सांगितले. चालकाने रेल्वे रूळाची तुटलेली अवस्था पाहिल्यानंतर डोक्याला हात लावला, असे रामदास थोरात सांगत होते. 
माझ्या पायाला मार लागल्याने मला लंगडत लंगडत रेल्वेच्या इंजिनजवळ पायी जाण्यासाठी १० ते १५ मिनिटांचा वेळ लागला. मी तेथे गेलो. तेथील नागरिक, रेल्वे चालक, रेल्वे प्रवाशांनीही माझ्या धाडसाचे कौतुक केले. येथे गेल्यावर ही हुतात्मा एक्स्प्रेस (भुसावळ-पुणे) असल्याचे मला समजले. त्यानंतर तातडीने रेल्वेचे येथील गँगमन सातपुते व रेल्वे चालकाने रेल्वेच्या अधिका-यांना माहिती दिली. तातडीने रेल्वेचे अधिकारी दाखल झाले. त्यांनी माझ्या धाडसाचे कौतुक केले. हजारो लोकांचे तुमच्यामुळे प्राण वाचल्याचे सांगितले. माझ्याकडून हजारो प्रवाशांचे जीव वाचल्याचे मोठे समाधान आहे, असे शेतकरी थोरात यांनी सांगितले. 
अहमदनगर जवळील देहरेनजीक रेल्वे थांबल्यानंतर रेल्वेचे कर्मचारी, अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही तासातच रेल्वे रुळाची दुरूस्ती केली. त्यानंतर हुतात्मा एक्स्प्रेस मार्गस्थ झाली. माझ्या प्रसंगावधानाचे प्रवाशांसह सर्वांनीच कौतुक केले. एका शेतकºयामुळे रेल्वेतील हजारो प्रवाशांचे प्राण वाचल्याने मोठी दुर्घटना टळली, असे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी योगेंदर देवांग यांनी सांगितल्याचेही थोरात म्हणाले.
 

Web Title: Thousands of passengers escaped in the direction of the train when the rule was broken; 'That' farmer gave 'Lokmat' information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.