पोहेगाव इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम चोरट्यांनी कटरने कापले, अकरा लाख रुपये घेऊन पसार

By सचिन धर्मापुरीकर | Published: December 19, 2023 05:01 PM2023-12-19T17:01:38+5:302023-12-19T17:02:43+5:30

सहा महिन्यापूर्वी देखील चोरट्यांनी हेच एटीएम तोडले होते. एटीएम शिंदे वस्तीपर्यंत गोदावरी उजव्या कॅनलच्या कडाला ओडत नेले होते.

Thieves cut Pohegaon Indian Overseas Bank's ATM with a cutter, made off with Rs.11 lakh | पोहेगाव इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम चोरट्यांनी कटरने कापले, अकरा लाख रुपये घेऊन पसार

पोहेगाव इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम चोरट्यांनी कटरने कापले, अकरा लाख रुपये घेऊन पसार

कोपरगाव (जि. अहमदनगर) : कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे इंडियन ओव्हरसीज बँकेच्या एटीएमवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत कटरच्या साह्याने एटीएम तोडले. एटीएममधील रोख रक्कम दहा लाख ८३ हजार ७०० रुपये घेऊन चोरट्यांनी पोबोरा केला. सहा महिन्यापूर्वी देखील चोरट्यांनी हेच एटीएम तोडले होते. एटीएम शिंदे वस्तीपर्यंत गोदावरी उजव्या कॅनलच्या कडाला ओडत नेले होते. मात्र त्यांना ते तोडण्यात यश आले नव्हते अखेर पुन्हा त्यांनी याच बँकेवर लक्ष करत बँकेचे प्रशासन व पोलिसांच्या नाकावर टिच्चून एटीएम तोडून त्यातील रक्कम पळवली. ही घटना मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली.

बँकेशेजारी असलेले जय भद्रा फिटनेस क्लबचे व्यवस्थापक राजेंद्र रोहमारे व बाबासाहेब घेर हे क्लब सुरू करण्यासाठी पहाटे आल्याने त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तात्काळ बँकेचे मॅनेजर बी. डी. कोरडे, बाबासाहेब खंडीझोड यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. बँकेचे मॅनेजर व प्रशासन ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला याबाबत कल्पना दिली. पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ व कर्मचारी पोहेगावात दाखल झाले. एटीएम तोडलेल्या घटनेची माहिती पोलिसांनी घेतली. अशाच पद्धतीने तळेगाव येथीलही बँकेचे एटीएम या चोरट्यानी रात्रीच फोडले असल्याचे पोलिसांनी सांगितले. सकाळी नऊ वाजता पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेले श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. 

याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, रात्री दोन वाजता शिर्डी पोलीस स्टेशनची पेट्रोलिंगची गाडी पोहेगाव वरून गस्त घालून गेली होती. त्यानंतर चोरट्याने हा मोका साधला. 
पोहेगाव पोलीस दूर क्षेत्र गेल्या पाच वर्षापासून बंद असल्याने अशा घटना घडत आहेत, असे नागरिकांनी बोलून दाखवले. पोहेगाव पोलीस दूरक्षेत्र सुरू करण्यासाठी वेळोवेळी आंदोलन उपोषणे करण्यात आली मात्र पोलीस प्रशासनाने यांनी याकडे पुरते दुर्लक्ष केले आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
 

Web Title: Thieves cut Pohegaon Indian Overseas Bank's ATM with a cutter, made off with Rs.11 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.