Sujay Vika will win 12 seats in the Assembly | विधानसभेच्या बाराही जागा जिंकणार : सुजय विखे 
विधानसभेच्या बाराही जागा जिंकणार : सुजय विखे 

अहमदनगर : शिवसेना-भाजपची अद्याप युती झालेली नाही. त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे. सध्या मात्र भाजपने जिल्ह्यातील बाराही जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे सध्यातरी १२-० याच फरकाने भाजप विधानसभेतही राहील. जे कमळाच्या तिकिटावर लढतील, ते जिंकतील. कोणाला तिकीट द्यायचे आणि कोणाला नाही, हे मुख्यमंत्री ठरवणार आहेत. कोणाची कितीही इच्छा असली तरी मुख्यमंत्र्यांच्या सर्व्हेमध्ये तो उत्तीर्ण झाला पाहिजे, असे खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले.
भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या कार्यक्रमानंतर विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, नगरची जागाही भाजपकडे घ्यावी, असे कार्यकर्ते आग्रह करीत आहेत. बैठका घेऊन कार्यकर्ते त्यांचे मत व्यक्त करीत आहेत. मात्र आधी उमेदवार कोण आहे, ते तरी सांगावे. त्याच्याकडे जनमत आहे का? मुख्यमंत्र्यांनी सर्व्हे केल्यानंतर त्यामध्ये त्याला सकारात्मक प्रतिसाद आहे का, या सर्व बाबीवर उमेदवारी ठरेल. अद्याप युती ठरलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात १२-० लढण्याची तयारी भाजपने केली आहे. मला मिळालेले मताधिक्य एकट्या भाजपचे नाही. नगरची जागा आपल्यासाठी मागून घ्या, असे कार्यकर्ते आग्रह करीत आहेत. मात्र जनतेमधून नाव आले पाहिजे. कार्यकर्त्यांची चर्चा मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे.

वादात पाय घालू नका
महापालिकेत वाद खूप आहेत. शिवसेना-भाजपच्या दोन्ही नगरसेवकांना समजून सांगितले आहे. वादाच्या मागे लागण्यापेक्षा विकासाच्या मागे लागा. वादात पाय घालू नका, असा त्यांना सल्ला दिला आहे. भांडण विकासावर झाले पाहिजे. महापालिकेत सेना-भाजप युतीबाबत प्रस्ताव नाही. यासाठी सेनेने पुढाकार घेतला पाहिजे.


Web Title: Sujay Vika will win 12 seats in the Assembly
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.