प्रेशर पाईप फुटल्याने बसमधून धूर; प्रवाशांची तारांबळ 

By सुदाम देशमुख | Published: March 20, 2024 02:09 PM2024-03-20T14:09:17+5:302024-03-20T14:09:55+5:30

तीन दिवसांत घारगाव परिसरात बस नादुरुस्त होण्याची ही तिसरी घटना आहे.

st bus burst smoke from pressure pipe a rush of passengers | प्रेशर पाईप फुटल्याने बसमधून धूर; प्रवाशांची तारांबळ 

प्रेशर पाईप फुटल्याने बसमधून धूर; प्रवाशांची तारांबळ 

लोकमत न्यूज नेटवर्क, घारगाव : पुणे येथून नाशिककडे जाणाऱ्या बसचा प्रेशर पाईप फुटला. बसमधून धूर निघू लागल्याने प्रवाशांनी बसमधून उड्या टाकल्या. प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. ही घटना नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे बुधवारी (दि.२०) सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास घडली. तीन दिवसांत घारगाव परिसरात बस नादुरुस्त होण्याची ही तिसरी घटना आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तळेगाव आगारातून बस क्रमांक एम एच ४० एन ९४०६ ही बस नाशिक-पुणे महामार्गाने नाशिक येथे जात होती. बुधवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास ही बस घारगाव येथे आली असता बसचा प्रेशर पाईप फुटला. त्यामुळे जोराचा आवाज झाला व बसच्या खालच्या बाजूने धूर निघू लागला. बसमधून अचानक धूर निघू लागल्याचे लक्षात आल्याने चालकाने प्रसंगावधान दाखवून त्वरित बस थांबवली. 

यावेळी बस मध्ये ४१ प्रवासी होते. धूर पाहून बसमधील प्रवाशांची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडाली. आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत बसमधून प्रवाशाना तात्काळ खाली उतरविण्यासाठी मदत केली. थोड्यावेळात धूर बंद झाला. या सर्व प्रकारामुळे प्रवासी मोठ्या प्रमाणात घाबरले होते. 

सुरक्षित प्रवास समजल्या जाणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना आवश्यक ते साहित्य पुरविण्यात येत नसल्याने चालकांना जीव धोक्यात घालून बसेस चालवाव्या लागत आहेत. शासनाने याकडे गंभीरतेने बघण्याची गरज असून एसटी महामंडळाला आवश्यक ते बस दुरुस्तीचे साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

गेल्या तीन दिवसांपासून घारगाव परिसरात दररोज एक बस बंद पडलेली दिसून येत आहे. प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. शासनाने लक्ष घालून नादुरुस्त बसेस व्यवस्थित दुरुस्त करूनच त्या महामार्गावर चालवाव्यात. - संदीप आहेर , माजी उपसरपंच घारगाव.

Web Title: st bus burst smoke from pressure pipe a rush of passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.