Shrigonda's four daughters selected for the Khelo India Wrestling Championship | श्रीगोंद्याच्या चार मुलींची खेलो इंडिया कुस्ती स्पर्धेसाठी निवड
श्रीगोंद्याच्या चार मुलींची खेलो इंडिया कुस्ती स्पर्धेसाठी निवड

बाळासाहेब काकडे । 
श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून महिला कुस्तीची दंगल सुरू झाली आहे. यंदा या केंद्रातील चार मुलींची मुलींची खेलो इंडिया कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या मुली आसाम राज्यात होणा-या खेलो इंडिया २०२० ही कुस्ती स्पर्धा गाजवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
श्रीगोंदा तालुक्यात पैलवान घडविण्यासाठी स्व. कुंडलिकराव जगताप, स्व. अण्णा पाटील पवार, स्व. बलभिम जगताप, स्व. बबनराव शेळके, जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते, देवा शेळके यांच्यासह अनेकांनी योगदान दिले. निंबवीचे मेजर अशोक शिर्के यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला, तर संदीप बारगुजे उपमहाराष्ट्र केसरी ठरले. काष्टीचा अजय रंधवे हा नॅशनल चॅम्पीयन मल्ल ठरला. आढळगावच्या सुपुत्राने कर्नाटकचे मैदान गाजविले. सध्या मुलांची कुस्तीत उदासीनता दिसते. गावोगावच्या तालमी बंद पडल्या आहेत. काही ठिकाणी कुस्ती यात्रेतील आखाड्यापुरतीच शिल्लक राहते की काय अशी भीती आहे. मात्र अशा परिस्थितीत केंद्रीय सुरक्षा दलातील पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत फंड यांनी भाग्यश्री व धनश्री या त्यांच्या लेकींनी कुस्तीत करिअर करावे यासाठी पाउल टाकले. भाग्यश्रीने आंतरराष्ट्रीयस्तरावर मजल मारली. त्यांच्यासह इतर मुलींनाही कुस्तीचे प्रशिक्षण मिळावे यासाठी फंड यांनी नोकरी सोडून  मार्च २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती प्रशिक्षण केेंद्राचा कुस्ती प्रशिक्षक किरण मोरे यांना बरोबर घेऊन श्रीगणेशा केला. त्यांच्याबरोबरच पूजा फंड यांनी मुलींच्या आहाराकडे लक्ष देण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे श्रीगोंद्याच्या मातीत महिला कुस्तीची नवी दंगल सुरू झाली.
या केंद्रात राज्यभरातून ३२ मुली दाखल झाल्या आहेत. यातीलच भाग्यश्री फंड (श्रीगोंदा), सोनाली मंडलिक (कर्जत), धनश्री फंड (श्रीगोंदा), पल्लवी पोटफोडे (दौंड) या मुलींची जानेवारी महिन्यात सोनापूरमध्ये (आसाम) होणा-या खेलो इंडियातील कुस्ती स्पर्धेसाठी वेगवेळ्या वजन गटात निवड झाली आहे. याशिवाय साक्षी मावळे (पारनेर), पायल मरागजे (मुंबई), सृष्टी येवले (पुणे), साक्षी इंगळे (मुंबई) व कामीनी देवीकर (श्रीगोंदा) यांनी राज्यपातळीवर यश मिळविले आहे.
  
    

Web Title: Shrigonda's four daughters selected for the Khelo India Wrestling Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.