Ratna Wadi breaks ghatghar record | पावसाचा रतनवाडीने मोडला घाटघरचा विक्रम

पावसाचा रतनवाडीने मोडला घाटघरचा विक्रम

राजूर : नगर जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणा-या घाटघरच्या एकूण पावसाचा विक्रम यावर्षी रतनवाडीने मोडीत काढला. यावर्षी रतनवाडी येथे बुधवारपर्यंत सुमारे साडेसहा हजार मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या काही वर्षांची एकूण पावसाची नोंद पाहता यावर्षी रतनवाडीत रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली.
सह्याद्रीच्या पर्वत रांगात रतनवाडी हे एक आदिवासी खेडे. निसर्ग आणि पर्यटनदृष्ट्या संपन्नतेचा वारसा असणा-या रतनवाडी गावाला यावर्षी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. जूनच्या अखेरीस उशिराने पावसाचे आगमन झाले. तरीही बुधवारी सकाळी येथे ६ हजार ४४९ मिमी एवढा विक्रमी पाऊस पडला आहे. जून महिन्यात ३८६ मिमी पावसाची नोंद झाली होती. जुलै व आॅगस्ट या दोन महिन्यात रतनवाडी परिसराला चार ते पाच वेळा अतिवृष्टीचा तडाखा बसला. या दोन महिन्यात तब्बल ५ हजार २६५ मिमी पावसाची नोंद झाली. सप्टेंबर महिन्याच्या अकरा दिवसात येथे ८१२ मिमी पावसाची नोंद झाली. अद्यापही येथे पाऊस पडत आहे.
जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणा-या भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील घाटघर येथे अनेक वेळा सहा हजार मिमीहून अधिक पावसाची अद्यापपर्यंत नोंद झाली आहे. २००५ साली तर तेथे तब्बल ७ हजार १०९ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. २००६ मध्येही तेथे ६ हजार ८५९ मिमी, २००८ मध्ये ६ हजार २७ मिमी पाऊस पडला होता. या वर्षीही बुधवारपर्यंत ६ हजार १६०  मिमी पावसाची नोंद झाली आहे. भंडारदºयात ४ हजार ५३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. अद्यापपर्यंत भंडारदरा येथे मागील चाळीस वर्षांत ४ हजार ५४४ मिमी पावसाची नोंद झाली होती. पाणलोटातील पांजरे येथे बुधवारपर्यंत ४ हजार ७०५ मिमी  तर वाकी येथे ३ हजार ८०७ मिमी पावसाची आजपर्यंत नोंद झाली आहे.

Web Title: Ratna Wadi breaks ghatghar record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.