शिर्डी : राज्याच्या राजकारणातून नारायण राणे हद्दपार झाले असून त्यांना राजकारणात दुर्बिण घेऊन शोधावे लागेल, अशी बोचरी टीका शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांनी केली़किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष असलेल्या रघुनाथ कुचिक यांनी साईदरबारी हजेरी लावली़ साईदर्शनानंतर त्यांचा भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष व महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य डी. डी. पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिवसेना उपनेते कुचिक म्हणाले, राज्याच्या राजकारणातून नारायण राणे हद्दपार झाले असून त्यांना राजकारणात दुर्बिण घेऊन शोधावे लागेल. सध्या राणे भाजपात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जाते. याबाबत बोलताना कुचिक म्हणाले, त्यांना हवं तिथ जावं, शिवसेना त्यांना भूईसपाट करण्यास सक्षम आहे़ सध्या भाजपा शिवसेनेकडे इतर पक्षांची मंडळी येत असून शिवसेनेकडे येणारी मंडळी ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन येत आहेत. श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे हेही त्यातलेच एक असून त्यांना शिवसेनेचे विचार पटलेत. त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून त्याचा प्रवेश पक्षप्रमुख उद्वव ठाकरे निश्चित करतील, असे ते म्हणाले़ यावेळी भारतीय कामगार सेना चिटणीस विश्वास जगताप, सहचिटणीस शुभम दिघे आदी उपस्थित होते.
राणेंना राजकारणात दुर्बिणीने शोधावे लागेल-रघुनाथ कुचिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 7:10 PM