शिर्डीत रामनवमीच्या उत्सवाला सुरूवात; साईभक्तांची मोठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 08:37 PM2018-03-24T20:37:27+5:302018-03-24T20:37:27+5:30

उद्या उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी पहाटे ४.३० वा. श्रींची काकड आरती, पहाटे ५.०० वा. अखंड पारायणाची समाप्‍ती होवून श्रींच्‍या फोटो व पोथीची मिरवणूक होईल.

Ram Navami festival started in Shirdi | शिर्डीत रामनवमीच्या उत्सवाला सुरूवात; साईभक्तांची मोठी गर्दी

शिर्डीत रामनवमीच्या उत्सवाला सुरूवात; साईभक्तांची मोठी गर्दी

googlenewsNext

शिर्डी: श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या श्रीरामनवमी उत्‍सवास आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली असून श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनासाठी राज्‍यातून विविध ठिकाणाहुन सुमारे १७५ पालख्‍यांसोबत आलेल्‍या पदयात्री साईभक्‍तांच्‍या श्रीसाईनामाच्‍या गजराने अवघी शिर्डी दुमदुमुन गेली.

  आज उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी पहाटे काकड आरतीनंतर साईबाबांच्‍या फोटोची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक व्‍दारकामाई पर्यंत काढण्‍यात आली. मिरवणूक व्‍दारकामाईत गेल्‍यानंतर श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाच्‍या अखंड पारायणाचा शुभारंभ झाला. यामध्‍ये उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम यांनी प्रथम, सौ.सरस्‍वती वाकचौरे यांनी व्दितिय, विश्‍वस्‍त अॅड.मोहन जयकर यांनी तृतिय, साईभक्‍त अभय धाढीवाल यांनी चौथा व श्रीमती छायाताई दत्‍तात्रय शेळके यांनी पाचव्‍या अध्‍यायाचे वाचन केले. सकाळी ६.१५ वाजता मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी सहपरिवार श्रींची विधीवत पाद्यपूजा केली.

आज उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी महाराष्‍ट्र राज्‍याचे वित्त आणि नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दुपारी ४.०० वा. समाधी मंदिराशेजारील स्‍टेजवर ह.भ.प.श्री.विक्रम नांदेडकर यांचे कीर्तन झाले. मंदिर परिसरात व्‍दारकामाई मंडळ,  मुंबई यांनी उभारलेला श्रीशंकर भगवान व श्री साईबाबांची मुर्ती असलेला देखावा व विद्युत रोषणाई पाहण्‍यासाठी साईभक्‍तांनी गर्दी केली होती. तसेच मंदिर व मंदिर परिसरात दिल्‍ली येथील देणगीदार साईभक्‍त श्रीमती स्‍नेहा शर्मा यांच्‍या देणगीतुन आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात आली.

 आज उत्‍सवाचा प्रथम दिवस असल्‍याने व्‍दारकामाई मंदिर पारायणासाठी रात्रभर उघडे ठेवण्‍यात आले. संस्‍थान प्रशासनाने संभाव्‍य गर्दीचे नियोजन केलेले असल्‍यामुळे सर्व साईभक्‍तांना सुखकर व सुलभतेने बाबांच्‍या दर्शनाचा लाभ मिळाला. उन्‍हाची तीव्रता लक्षात घेवून संस्‍थान प्रशासनाने दर्शन रांगेसह ठिकठिकाणी पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था ठेवली. श्रीरामनवमी उत्‍सवाच्‍या औचित्‍यावर श्रींच्‍या नित्‍यांच्‍या आरतीकरीता मुंबई येथील दानशुर साईभक्‍त श्री.जयंतभाई यांनी ३९ लाख १ हजार ६८८ रुपये किंमत असलेली १३५१ ग्रॅम वजनाची सोन्‍याची पंचारती देणगी स्‍वरुपात मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांच्‍याकडे सुपुर्त केली. सदरची सोन्‍याची पंचारती दैनंदिन आरतीसाठी वापरण्‍यात येणार आहे.

उद्या उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी पहाटे ४.३० वा. श्रींची काकड आरती, पहाटे ५.०० वा. अखंड पारायणाची समाप्‍ती होवून श्रींच्‍या फोटो व पोथीची मिरवणूक होईल. पहाटे ५.२० वा. कावडींची मिरवणूक व श्रींचे मंगलस्‍नान होईल. सकाळी १० ते १२ यावेळेत समाधी मंदिराशेजारील स्‍टेजवर श्रीरामजन्‍म किर्तन कार्यक्रम, दुपारी १२.३० वा. माध्‍यान्‍ह आरती होणार आहे. दुपारी ४.०० वा. निशाणांची मिरवणूक तर सायं.५.०० वा. श्रींच्‍या रथाची गावातून मिरवणूक होणार आहे. मिरवणूक परत आल्‍यानंतर सायं.६.३० वा. धुपारती होईल. रात्रौ ७.०० ते १०.०० यावेळेत श्रीमती श्रध्‍दा देसाई, स्‍वरश्री आनंद प्रतिष्‍ठाण, मुंबई यांचा गायन व ग्रुप डान्‍स कार्यक्रम होणार आहे. रात्रौ १०.०० ते पहाटे ५.०० वाजेपर्यंत श्रींचे समोर इच्‍छुक कलाकारांचा हजेरी कार्यक्रम होईल. उद्या उत्‍सवाचा मुख्‍य दिवस असल्‍याने समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील. यामुळे दिनांक २५ मार्च रोजीची नित्‍याची शेजआरती व दिनांक २६ मार्च रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही.

Web Title: Ram Navami festival started in Shirdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.