Police constable Shailesh Jawale survives due to friends | श्रीगोंद्यातील मित्रामुळे पोलीस काॅन्स्टेबल शैलेश जावळेचा वाचला जीव 

श्रीगोंद्यातील मित्रामुळे पोलीस काॅन्स्टेबल शैलेश जावळेचा वाचला जीव 

श्रीगोंदा- अहमदनगर -श्रीगोंदा रोडवर पारगाव फाट्यानजीक कॅनॉलजवळ फोर्ड ऐकॉन कंपनीच्या गाडीचा स्फोट झाला. या स्फोटात पोलीस काॅन्स्टेबल शैलेश जावळे जखमी झाले, गाडीचा स्फोट होण्यापूर्वी श्रीगोंद्यातील तीन मित्रांनी शैलेश जावळे यांना गाडीतून बाहेर काढले, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. ही घटना गुरुवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली. 

जावळे यांना श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, प्रकृती ठीक असल्याचे समजते. जावळे हे श्रीगोंद्याला बहिणीला भेटण्यासाठी आले होते, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. समजलेली अधिक माहिती अशी की, शैलेश जावळे हे गाडी चालवत होते, त्यांचा वळणावर गाडीवरील कंट्रोल सुटला. गाडी वळणावरच्या कटड्यावर आदळली आणि पलटी झाली. यामध्ये शैलेश जावळे जखमी झालेले पाहून  पाठमागून गाडीनं येणारे श्रीगोंद्याचे वैभव भंडारी, अनिकेत गुगळे, संतोष बोळगे हे घटनास्थळी थांबले आणि त्यांनी जावळे यांना गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर लागलीच गाडीचा स्फोट झाला. अशा परिस्थितीत या मित्रांनी 108ला फोन केला आणि शैलेश जावळे यांना तातडीने श्रीगोंदा येथील रुग्णालयात दाखल केले. शैलेश जावळे यांचा मित्रांच्या प्रसंगावधानानं जीव बचावला. 
 

Web Title: Police constable Shailesh Jawale survives due to friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.