‘लोकमत’ने केला शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान : ‘शूरा आम्ही वंदिले’ विशेषांकाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 11:33 AM2018-08-15T11:33:03+5:302018-08-15T11:34:20+5:30

‘लोकमत’ अहमदनगर आवृत्तीने आपल्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘शूरा आम्ही वंदिले’ हा शहिदांच्या शौर्यगाथा सांगणारा विशेषांक प्रकाशित केला असून स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जवानांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान केला.

'Lokmat' honors Shahid's family members: Welcome to 'Shura we Vandili' specialties | ‘लोकमत’ने केला शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान : ‘शूरा आम्ही वंदिले’ विशेषांकाचे स्वागत

‘लोकमत’ने केला शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान : ‘शूरा आम्ही वंदिले’ विशेषांकाचे स्वागत

Next

अहमदनगर : ‘लोकमत’अहमदनगर आवृत्तीने आपल्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘शूरा आम्ही वंदिले’ हा शहिदांच्या शौर्यगाथा सांगणारा विशेषांक प्रकाशित केला असून स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जवानांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान केला. आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा या उपक्रमात सहभागी झाले. अण्णा हजारे यांनीही ‘लोकमत’च्या वतीने राळेगणसिद्धी येथे शहीद कुटुंबाचा सत्कार केला. या उपक्रमासाठी रेणुकामाता मल्टिस्टेट को-आॅपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी यांनी सहयोग दिला.
स्वातंत्र्यानंतरच्या वेगवेगळ्या युद्धात नगर जिल्ह्यातील सुमारे ५२ जवान शहीद झाले आहेत. सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या शहिदांची माहिती एकत्रित स्वरुपात उपलब्ध नाही. त्यामुळे ‘लोकमत’ने सर्व शहिदांच्या कुटुंबीयांना भेट देऊन त्यांच्या गौरवगाथा संकलित केल्या. शहिदांप्रती व त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वीर माता, वीर पत्नी व वीर पित्यांचा सत्कार करण्यात येत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते मंगळवारी काही कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. रेणुकामाता मल्टिस्टेट को-आॅपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत भालेराव हेही यावेळी उपस्थित होते.
पोपटराव पवार व ‘लोकमत’टीम व शहिदांच्या घरी जाताच त्यांच्या कुटुंबीयांचे डोळे पाणावले. नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील गोरख जाधव या शहीद जवानाचा लष्करी गणवेश व साहित्य कुटुंबीयांनी संग्रहालयाच्या रुपाने घरात जतन करुन ठेवले आहे. हे संग्रहालय पाहताना पोपटराव पवारही भावुक झाले. टाकळी खातगाव येथे सुरेश नरवडे या जवानाचे गावाने स्मारक उभारले आहे. कुटुंबीयांनी या उपक्रमाची यावेळी माहिती दिली. १९७१ च्या युद्धात शहीद झालेले कॅप्टन राजाभाऊ कुलकर्णी यांच्या वीरपत्नी रेवाताई कुलकर्णी व मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्या घरी जाऊन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कॅप्टन राजाभाऊ यांच्या आठवणी सांगताना या मायलेकरांचे डोळे डबडबून आले. यावेळी कॅप्टन कुलकर्णी यांचे पुतणे व नगरच्या ‘स्रेहालय’ संस्थेचे संस्थापक गिरीश कुलकर्णी उपस्थित होते. अण्णा हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे वडनेर हवेली येथील शहीद जवान अरुण कुटे यांच्या वीर पित्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी या पित्याचे हृदय गलबलून आले. ‘लोकमत’च्या वतीने जिल्ह्यातील सर्वच शहिदांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात येत आहे.
‘लोकमत’ व मान्यवरांनी आमच्या परिवाराला आज भेट दिली त्याबद्दल आभारी आहोत. देशात एकात्मतेची भावना वाढीस लागावी एवढीच अपेक्षा यानिमित्त आहे. ‘लोकमत’ने यासाठी प्रयत्न करावेत.
- रेवाताई कुलकर्णी, वीरपत्नी,


‘लोकमत’चा उपक्रम प्रेरणादायी
‘लोकमत’चा उपक्रम स्वागतार्ह आहे. देशसेवा हे सर्वोच्च कर्तव्य आहे. त्यामुळे शहिदांच्या बलिदानाचे स्मरण ठेवत त्यांच्या कुटुंबीयांची समाजाने काळजी घेतली पाहिजे. प्रत्येकाने सर्वच सैनिकांच्या भावनांचा व बलिदानाचा आदर करावा. - अण्णा हजारे, 
ज्येष्ठ समाजसेवक


जवानांचा सन्मान ठेवा
‘लोकमत’चा उपक्रम प्रेरणादायी व आदर्शवत आहे. जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचा विशेषांक प्रकाशित करण्यात आला आहे. प्रत्येक गावाने शहिदांच्या स्मृत्यर्थ उपक्रम राबविणे आवश्यक आहे. ध्वजारोहणाचा मान या कुटुंबीयांना दिल्यास त्यांचा उचित सन्मान केल्यासारखे होईल. - पोपटराव पवार, आदर्श गाव समिती राज्य कार्याध्यक्ष.

Web Title: 'Lokmat' honors Shahid's family members: Welcome to 'Shura we Vandili' specialties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.