लोकमत-सीएसआरडी आयोजित मानवी साखळीतून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 12:17 PM2020-03-04T12:17:11+5:302020-03-04T12:18:19+5:30

‘आम्ही-तुम्ही आपण-सर्वजण करूया पर्यावरणाचे रक्षण’ असा संदेश देत शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने  मंगळवारी सकाळी स्टेशनरोड रस्त्यावर मानवी साखळी तयार करून पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करण्यात आली. 

Lokmat-CSRD organized environmental protection message from human chain | लोकमत-सीएसआरडी आयोजित मानवी साखळीतून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश

लोकमत-सीएसआरडी आयोजित मानवी साखळीतून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश

googlenewsNext

अहमदनगर : ‘प्रकृतीचे नका करू हरण, चला वाचवूया आपले पर्यावरण’, ‘शाळेमधून धडा हा गिरवूया, पर्यावरणाचे रक्षण करूया’, ‘बर्फ वितळल्याने येतो नदी-नाल्यांना पूर, निसर्गापासून आपण का जातोय दूर दूर’, ‘आम्ही-तुम्ही आपण-सर्वजण करूया पर्यावरणाचे रक्षण’ असा संदेश देत शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने  मंगळवारी सकाळी स्टेशनरोड रस्त्यावर मानवी साखळी तयार करून पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करण्यात आली. 
औद्योगिक क्रांतीचे जनक जमशेदजी टाटा यांच्या जयंतीनिमित्त टाटा पावर, सीएसआरडी महाविद्यालय, आय लव नगर, स्नेहालय, बॉस्को ग्रामीण विकास केंद्र,  अ‍ॅक्शन अर्थ, टी.पी.सी.डी.टी., फ्रायडे फॉर फ्युचर-पुणे या संस्थांच्या वतीने ही मानवी साखळी आयोजित करण्यात आली होती. ‘लोकमत’ व रेडिओ सिटी कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते.  सकाळी नऊ वाजता सीएसआरडी ते मार्केट यार्ड चौक अशी मानवी साखळी तयार करण्यात आली. सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट स्कूल, सीएसआरडी, अहमदनगर कॉलेजचे विद्यार्थी, तसेच नगर तालुक्यातील रांजणी, मेहेकरी, सोनेवाडी, देवगाव, आगडगाव येथील ग्रामस्थ असे सुमारे १ हजार जण या मानवी साखळीत सहभागी झाले होते. सीएसआरडीतून विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाच्या घोषणा देत रॅली काढली. रॅली मार्केट यार्डपर्यंत गेल्यानंतर सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घेत साखळी केली. यावेळी ‘आम्ही-तुम्ही आपण-सर्वजण करूया पर्यावरणाचे रक्षण’ या घोषणेने परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर ही रॅली पुन्हा सीएसआरडीत आली. तेथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
प्रमुख पाहुणे म्हणून अकोले येथील सेंद्रिय शेतीच्या प्रचारक ममता भांगरे, ‘लोकमत’चे आवृत्तीप्रमुख सुधीर लंके, विभागीय वन अधिकारी किर्तीकिशोर जमदाडे, स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी, टाटा पॉवर कंपनीचे अधिकारी विश्वास सोनावळे, प्रवीण वाघ, प्रवीण शेंडकर, पुण्यातील फ्रायडे फॉर फ्युचर या संस्थेच्या गंगोत्री चंदा, बास्को केंद्राचे फादर जॉर्ज, सेंद्रिय शेतीतील प्रगतशिल शेतकरी संपत वाकचौरे उपस्थित होते. सीएसआरडीचे संचालक सुरेश पठारे यांनी सर्वांचे स्वागत केले.
ममता भांगरे म्हणाल्या,रासायनिक खतांमुळे शेतीची पार वाट लागली आहे. त्यामुळे आता सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही. आपणास जन्म देणारी माता जेवढी महत्त्वाची तेवढीच पालनपोषण करणारी मातीही आहे. या मातीचा सन्मान करा. घराच्या दारात फळे, भाजीपाला पिकवा. शहरात मुबलक पाणी असल्यामुळे त्याची नासाडी अधिक होते. अकोल्यासारख्या दुर्गम भागात हंडाभर पाण्यासाठी महिलांना कोसो दूर पायपीट करावी लागते. त्यामुळे आम्ही घरातले पाणी वाचवून अंगणात भाजीपाला पिकवला आहे.
चांगले खाल्ले तर चांगले आरोग्य मिळेल. 
सुरेश पठारे यांनी या उपक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. पर्यावरणाचा ºहास होतोय असे अनेकांना वाटते, पण ते थांबवण्यासाठी कृती मात्र होत नाही. ही कृती करण्याची आता गरज आहे. त्यासाठी वेगळे काही करू नका. आपल्या दैनंदिन कामातच पर्यावरण रक्षणाचा कार्यक्रम आखून घ्या. तरूणांनी यात खास पुढाकार घ्यावा. प्रत्येकाने एक झाड लावून ते अखेरपर्यंत जगवावे व तसा संदेश पुढे द्यावा. यातूनच ही मानवी साखळी तयार होऊन पर्यावरणासाठी मोठे काम होईल.
गंगोत्री चंदा यांनी जागतिक तापमान वाढीबद्दल चिंता व्यक्त केली. पर्यावरणाच्या असंतुलनामुळे शेतीसह सर्वांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. यातून भावीपिढीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे  युवकांनी पर्यावरणासाठी आठवड्यातील एक दिवस द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सुधीर लंके यांनी पर्यावरणाचे धोके लक्षात घेता यातून वेळीच सावरण्याची गरज व्यक्त केली. अकोल्यासारख्या दुर्र्गम भागातून राहीबाई पोपेरे यांनी जुन्या गावरान बियाणांचे जतन केले. त्यापासून मिळणारे उत्पादन विषमुक्त असून यातून एक पिढी वाचणार आहे. याची दखल घेत शासनाने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला. ममता भांगरे याही अकोल्यातीलच असून सेंद्रिय शेतीचा संदेश त्या भारतभर देत आहेत. या खेड्यापाड्यातील महिलांना पर्यावरणाचे महत्व समजले तसे सर्वांना समजायला हवे, असे त्यांनी सांगितले.
गिरीश कुलकर्णी म्हणाले, देशात सध्या लोकांना आपल्या जात-धर्माची चिंता अधिक आहे. मात्र पर्यावरणाची नाही. धरतीमातेचे रक्षण झाले तरच आपले  रक्षण होणार आहे.
सीएसआरडीचे सुरेश पठारे, सुरेश मुगूटमल, प्रदीप जारे व सर्व शिक्षक-कर्मचाºयांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. उद्धव काळापहाड यांनी सूत्रसंचालन केले. 

Web Title: Lokmat-CSRD organized environmental protection message from human chain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.