कोपरगाव तालुक्यासाठी पालखेड डावा कालव्यातून दोन दिवसात पाणी मिळणार -स्नेहलता कोल्हे 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 07:14 PM2023-10-05T19:14:18+5:302023-10-05T19:14:29+5:30

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाला दिले पाणी सोडण्याचे आदेश

Kopargaon taluka will get water from Palkhed left canal in two days - Snehlata Kolhe | कोपरगाव तालुक्यासाठी पालखेड डावा कालव्यातून दोन दिवसात पाणी मिळणार -स्नेहलता कोल्हे 

कोपरगाव तालुक्यासाठी पालखेड डावा कालव्यातून दोन दिवसात पाणी मिळणार -स्नेहलता कोल्हे 

googlenewsNext

कोपरगाव (जि. अहमदनगर) : पावसाअभावी कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागात पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे पालखेड डावा कालव्यातून पाणी सोडून कोळ नदीवरील बंधारे भरून द्यावेत. तसेच  नारंदी नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यात पाणी सोडावे, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यावर फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना पालखेड डावा कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश दिले असून, पूर्व भागात येत्या दोन दिवसांत पालखेड डावा कालव्याचे पाणी सोडण्यात येणार आहे.  

यंदा कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागात पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, पाण्याअभावी नागरिकांचे व शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. पूर्व भागातील  दहेगाव बोलका, पढेगाव, कासली, उक्कडगाव, तिळवणी, शिरसगाव, सावळगाव, करंजी, ओगदी, आपेगाव, गोधेगाव बोलकी, आंचलगाव, शिंगणापूर, आंचलगाव, बोलकी, शिंगणापूर आदी गावांना पालखेड डावा कालव्यातून पाणीपुरवठा होतो. शिरसगाव, सावळगाव, तिळवणी, आपेगाव, गोधेगाव या गावांच्या पाणीपुरवठा करण्यासाठी कोळ नदीवर बंधारे बांधण्यात आले असून, पालखेड डावा कालव्यातून या बंधाऱ्यात पाणी सोडल्यानंतरच या गावातील लोकांना पाणी मिळते.  सद्य:स्थितीत या भागातील विहिरी कोरड्याठाक असून शेतीसाठी पाण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे पालखेड डावा कालव्यातून तात्काळ पाणी सोडून या भागातील बंधारे व पाझर तलाव भरून द्यावेत, अशी मागणी पूर्व भागातील शेतकऱ्यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याकडे केली होती.  

कोल्हे यांनी तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे पाण्याअभावी हाल होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. फडणवीस यांनी लगेचच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना पालखेड डावा कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. येत्या दोन दिवसांत पालखेड डावा कालव्यातून दहेगाव बोलका, पढेगाव, कासली, उक्कडगाव, तिळवणी, शिरसगाव, सावळगाव, करंजी, ओगदी, आपेगाव, गोधेगाव या गावांसाठी चारी नंबर ४५ व ५२ मध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर आंचलगाव, बोलकी, शिंगणापूर येथील नारंदी नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यातदेखील पालखेड डावा कालव्यातून पाणी सोडण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता भागवत यांनी सांगितले.

Web Title: Kopargaon taluka will get water from Palkhed left canal in two days - Snehlata Kolhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.