काॅपी झाली तर संबंधित परीक्षा केंद्र संचालकांवर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By चंद्रकांत शेळके | Published: February 13, 2024 03:40 PM2024-02-13T15:40:56+5:302024-02-13T15:45:02+5:30

दक्षता समिती बैठकीत दहावी-बारावी परीक्षेचे नियोजन

In case of copying, action will be taken against the concerned examination center director; Orders of Collectors | काॅपी झाली तर संबंधित परीक्षा केंद्र संचालकांवर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

काॅपी झाली तर संबंधित परीक्षा केंद्र संचालकांवर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अहमदनगर : दहावी-बारावी परीक्षांच्या अनुषंगाने परीक्षा केंद्रावर काॅपी होणार नाही, याची सर्वच यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. जर केंद्रावर काॅपी झालेली आढळली तर केंद्र संचालकांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि. १२) दक्षता समितीची बैठक झाली. त्यात आगामी दहावी-बारावी परीक्षांच्या अनुषंगाने तयारीचा आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी सालिमठ यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलिस अधीक्षक राकेश ओला, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक कडूस, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आदी उपस्थित होते. यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या काळात, तर दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्च या काळात होणार आहे. बारावीसाठी एकूण ११०, तर दहावीसाठी १८१ परीक्षा केंद्र असतील.

परीक्षा कालावधीत जास्तीत जास्त परीक्षा केंद्रांना भेटी देण्यात याव्यात, उपद्रवी केंद्रांना परीक्षा कालावधीत विशेष करून भेटी देऊन गैर प्रकारास आळा घालावा, प्रत्येक परीक्षा केंद्रावर तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्या भेटी व्हाव्यात, या पथकाने परीक्षा तणावमुक्त वातावरणात पार पडतील, असे प्रयत्न करावेत, उपस्थित पर्यवेक्षकामार्फत विद्यार्थ्यांची झडती केंद्रावर घेण्यात यावी, जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलिस बंदोबस्त देण्यात यावा, परीक्षा केंद्रावर इलेक्ट्राॅनिक्स साधनांच्या वापरावर प्रतिबंध करावा, परीक्षा केंद्र परीसरातील सर्व झेरॉक्स सेंटर पेपरच्या कालावधीत बंद ठेवावेत, परीक्षा केंद्रावरील बैठे पथकाच्या भेटी वाढवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी सालिमठ यांनी दिल्या.

दहावीसाठी ६८ हजार, बारावीसाठी ६४ हजार विद्यार्थी
यंदा दहावी परीक्षेसाठी ६८ हजार ८९७, तर बारावीच्या परीक्षेसाठी ६४ हजार ४७ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. दहावीची परीक्षा १२ दिवस, तर बारावीची परीक्षा २२ दिवस चालणार आहे. संवेदनशील केंद्रांवर सीसीटीव्हीची करडी नजर राहणार आहे.

जिल्हास्तरावर सात भरारी पथके
गैरप्रकाराला आळा बसावा म्हणून जिल्हास्तरावर ७ भरारी पथके तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय गणित, इंग्रजी या विषयांच्या पेपरला प्रत्येक परीक्षा केंद्रावर गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत बैठे पथक नियुक्त केले जाणार आहे. गणित, इंग्रजी या पेपरच्या दिवशी संवेदनशील केंद्रांवर व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे.

Web Title: In case of copying, action will be taken against the concerned examination center director; Orders of Collectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.