नगरमधील परप्रांतीय मजुरांची घरवापसी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:18 AM2021-04-14T04:18:25+5:302021-04-14T04:18:25+5:30

केडगाव : राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असल्याने राज्य सरकारने पुन्हा कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. नगरमधील उद्योगांचे चाकेही ...

Homecoming of foreign workers in the city begins | नगरमधील परप्रांतीय मजुरांची घरवापसी सुरू

नगरमधील परप्रांतीय मजुरांची घरवापसी सुरू

Next

केडगाव : राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असल्याने राज्य सरकारने पुन्हा कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. नगरमधील उद्योगांचे चाकेही बंद पडले आहेत. यहाँ भुखे मरने से अच्छा हैं गाव लौट जाए असे म्हणत रोज दीड ते दोन हजार परप्रांतीय कामगारांनी आता आपल्या गावांची वाट धरली आहे. कामगारांच्या घरवापसीमुळे नगरचे रेल्वेस्थानक सध्या परप्रांतीयांच्या गर्दीने गजबजून गेले आहे.

राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता विकेंड लॉकडाऊन सुरू केले. यामुळे नगरमधील उद्योगनगरीचे चाके बंद पडली आहेत. कंपनीमालक, ठेकेदार यांनी हात वर केल्याने उपासमार होत असलेल्या परप्रांतीय मजुरांनी आपल्या कुंटुबासह पुन्हा आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना परिस्थिती आवाक्याबाहेर जात असल्याने दोन दिवसांत पुन्हा कडक लॉकडाऊनचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत यामुळे इथे उपासमारीने दिवस काढण्यापेक्षा आपल्या गावी गेलेले बरे असे म्हणत रोजचे दीड ते दोन हजार परप्रांतीय कामगार आता मिळेल त्या वाहनाने घर वापसी करीत आहेत. काही मजुरांनी खासगी बसचा आसरा घेतला असून, रात्री शहरातील स्वस्तिक चौकात अशा मजुरांची गावाकडे परतण्यासाठी मोठी गर्दी लोटली होती.

.............

उपासमार सहन होण्याच्या पलीकडे

आम्ही नगरमध्ये कारखान्यात कामगार आहेत. कोरोनामुळे मनात भीती निर्माण झाली आहे. घरच्यांची खूप आठवण येत आहे. तिकडे घरात बसून कसेतरी दिवस काढू, पण इथं उपासमार कशी सहन करणार मागच्या वेळी त्रास झाला होता. म्हणून आम्ही परत जात आहोत.

- अरुणकुमार पासवान, कलामू, झारखंड

............

कोरोना गेल्याशिवाय पुन्हा येणार नाही

आमच्या गावाकडे रोजगार नाही म्हणून आम्ही येथे कामासाठी आलो आता लॉकडाऊन होणार असल्याने पुन्हा गावाकडे निघालो आहे. जवळ पैसे नाही, उद्या जीवाचे बरेवाईट झाले तर आमचे येथे कोणीच नाही. काम सोडण्याची वाईट वेळ आली आहे. जोपर्यंत कोरोना जात नाही तोपर्यंत आता येणार नाही. दोन महिन्यांपूर्वी आलो होतो आता पुन्हा परतावे लागत आहे.

- संदीप चौरसिया, गोरखपूर, उत्तर प्रदेश

............

वाईट दिवस काढले

आम्ही काम करत असलेली कंपनी लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आली. पैसे पण मिळाले नाही. इथे उपासी राहण्याची वेळ आहे. मागच्या वेळी येथे राहून फसलो. गावाकडे उन्हातान्हात मिळेल ते काम करू पण इथे नको.

- राज बहौर कोहेल, रिवा, मध्य प्रदेश

...........

मागील वर्षिच्या पायपिटीचा कटु अनुभव

मागील वर्षीअचानक लॉकडाऊन सुरू झाले. वाहन व वाहतूक व्यवस्था बंद झाली. परप्रांतीय कामगारांना घरी परतण्याचे दारे बंद झाले. अशा वेळी नगरमधून हजारो परप्रांतीय पायपीट करीत हजारो मैलांचा प्रवास करून आपल्या गावाकडे गेले. काहींनी हजारो मैल सायकल चालवत आपले गाव गाठले. जवळ खाण्यापिण्याचे साहित्य नाही, वाईट अनुभव आल्याने यावेळी आधीच सावध होत परप्रांतीय कामगार आपल्या घरी परतत आहेत.

..............

फोटो : केडगाव

उत्तर भारतात जाण्यासाठी सर्वाधिक गर्दी राजस्थानमधील बहुतेक मजूर खासगी बसचा आधार घेत गावी परतत आहेत. मात्र उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश उत्तर भारतातील परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने रेल्वेने गावी परतत आहेत. मार्गावरील रेल्वेगाड्या सध्या अशा स्थलांतरित कामगारांनी फुल्ल भरून जात आहेत.

सर्व छाया : योगेश गुंड

Web Title: Homecoming of foreign workers in the city begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.