A hard-working fighting for the underprivileged | कष्टकरी, वंचितांसाठी लढणारा कॉम्रेड

कष्टकरी, वंचितांसाठी लढणारा कॉम्रेड

अहमदनगर : कॉ. आप्पासाहेब ठुबे हे पारनेर गावचे जावई होते. कॉ. भास्करराव औटी यांची बहीण हौसाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. कॉ. बाबासाहेब हे आप्पासाहेब ठुबे यांचे कनिष्ठ चिरंजीव होय. आप्पासाहेब ठुबे हे औटींच्या सानिध्यात आल्याने ते कम्युनिस्ट बनले. आप्पासाहेब प्राथमिक शिक्षक होते. शिक्षक असतानाच ते भास्करराव औटी यांच्या सहवासाने कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होत असत. साहजिकच बाबासाहेबांच्या बालमनावर वडील व मामा यांच्या विचारसरणीचा प्रभाव पडला. कष्टकºयांची सतत दैना व ऐतखाऊंची सतत चंगळ असते, असे वर्गभेद मिटवून वर्गविहीत समाज रचना निर्माण करण्याचे ध्येय बाबासाहेबांनी लहान वयातच शिकून घेतले व तेच त्यांचे जीवन कार्याचे ध्येय बनले. म्हणून ते मामा व वडील यांच्या प्रेरणेने कम्युनिस्ट झाले. बाबासाहेब लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. आप्पासाहेब ठुबे गुरुजी स्वत: स्वयंपाक करून मुलांना सांभाळू लागले. लहानगा बाबासाहेब त्यांना मदत करू लागला व स्वयंपाक करू लागला. बाबासाहेब आमदार असताना व नसताना गाडीलगाव येथील शेतातील घरामध्ये कार्यकर्त्यांना जेवण करून वाढीत असत. तसेच कान्हूर येथे त्यांच्या घरी त्यांची पत्नी नंदादेवी रात्री ११ वाजता आलेल्या कार्यकर्त्यांनाही जेवण वाढीत असत.
बाबासाहेब वकील होते. कोर्टात वकिली करीत असताना तालुक्यातील शेतकरी, मजूर, निराधार विद्यार्थी, बेरोजगार तरुणांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते पुढाकार घेत़ शेतकºयांसाठी गावोगावी पारावर उभे राहून सभा घेतल्या. त्यांचा आवाज पहाडी होता. पारनेरच्या बाजारतळापासून मामलेदार कचेरीपर्यंत मागण्यांच्या घोषणा ते देत असत. अशी असंख्य आंदोलने पारनेरच्या पेठेने अनुभवलेली आहेत. प्रवास करण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जीप दिली होती़ 
ते स्वत: जीपचे ड्रायव्हर असत. त्यांच्या जीपला लोक लाल सलाम जीप म्हणत असत. त्यांना संपूर्ण मतदारसंघ, त्यातील गावे, शिवार तोंडपाठ असे. बाबासाहेबांना ओळखत नाही असा माणूस तालुक्यात नव्हता. विधानसभेमध्ये मराठी व इंग्रजीमध्ये ते जनतेचे प्रश्न मांडायचे. निवडणुकीच्या खर्चासाठी लोकांनी वर्गणी जमा केली. प्रचार केला व त्यांना १९८५ मध्ये विधानसभेवर निवडून आणले. 
कॉ. बाबासाहेबांनी कष्टकºयांचे अनेक प्रश्न विधानसभेमध्ये मांडले. राज्यातल्या ८७ दुष्काळी तालुक्याचे ते प्रतिनिधी बनले. आमदार असताना २५० पाझर तलाव त्यांनी पूर्ण केले. पाझर तलावामध्ये आपली जमीन जाऊ नये म्हणून शेतकºयांच्या रोषाला ते बळी पडत असत. शेतकºयांना ते पटवून देत असत की, तुमची थोडी शेती तलावात जाईल परंतु तुमची उरलेली शेती पाण्याखाली येईल. तलावात पाणी साठल्यानंतर शेतकºयांनी पिकाला पाणी देऊन भरघोस पिके घेतली व तलावाला विरोध करणारे शेतकरी बाबासाहेबांचे भक्त बनले. कॉ. एस. ए. डांगे यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पक्षातून काढून टाकल्यानंतर त्यांनी आॅल इंडिया कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. त्यावेळी कॉ. बाबासाहेब ठुबे डांगे यांच्या पक्षामध्ये सामील झाले व महाराष्टÑ राज्याचे सेक्रेटरी झाले. कोपरगाव मतदारसंघात बाळासाहेब विखे हे काँग्रेस (आय) पक्षाचे उमेदवार होते. त्यांच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने कॉ. माधवराव गायकवाड यांना उभे केले. परंतु कॉ़ डांगे यांच्या भूमिकेशी अनेक लोक सहमत नव्हते़ त्यामुळे बाबासाहेब ठुबे यांची द्विधा अवस्था निर्माण झाली. त्यांनी विखे यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. बाळासाहेब विखे अतिशय थोड्या फरकाने विजयी झाले.
शेतकरी व कामगार यांना कर्ज मिळावे व त्यांची बचत जमा होण्यासाठी त्यांनी कान्हूरपठार पतसंस्था सुरू केली व ती नावलौकिकास आणली. लोकशाही मार्गाने ती इतरांच्या ताब्यात गेल्याने ते खचले नाहीत़ त्यांनी राजे शिवाजी पतसंस्था सुरू केली व ती उत्तम चालवली. लोकांचा सतत पाठिंबा प्रामाणिकपणाला मिळतो. एवढेच करून ते थांबले नाही, तर अडचणीत आलेल्या पारनेर साखर कारखान्याची निवडणूक जिंकून ते चेअरमन झाले. ऊस मिळविण्यासाठी ते पायाला भिंगरी बांधून फिरले. त्यांना कारखाना कामगारांची साथ मिळाली. कॉ. बाबासाहेब आमदार असताना तालुक्यामध्ये सूतगिरणी चालू करण्याचे ठरले. त्याच्या पूर्ततेसाठी व अभ्यासासाठी दौरा करण्याचे निश्चित झाले. कॉ. बाबासाहेबांबरोबर मी, ज्येष्ठ नेते मार्तंडराव पठारे, रमेशशेठ अगरवाल होते.  
जाहीर सभेमध्ये राजकारणातील चुका मान्य करण्याचे धाडस फक्त कॉ़ बाबासाहेबच दाखवू शकतात़ आमदार नसतानाही ते सातत्याने लोकांच्या प्रश्नावर जागृती करून लढे उभारत राहिले. मामलेदार कचेरीवर विविध आंदोलनांमधून लोकांचे प्रश्न शासनापुढे मांडत राहिले. धर्म, जाती निरपेक्ष राजकारणाचा वसा त्यांनी कधीच सोडला नाही. कॉ. बाबासाहेब हे गाडीलगाव (ता़ पारनेर) येथील शेतामध्ये असणाºया घरात राहत होते. त्यावेळी पाऊस पडून गेलेला होता. जमीन ओली झालेली होती. त्या जमिनीमध्ये विजेचा प्रवाह उतरला होता. वीज प्रवाह खंडित करण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांना विजेचा धक्का बसला व जागेवरच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पारनेरकर एका लढवय्या कॉम्रेडला मुकले, ते कायमचेच़

लेखक - पी. आर. कावरे

Web Title: A hard-working fighting for the underprivileged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.