Five injured in Dindi motorcycle accident | मोटारसायकल अपघातात दिंडीतील पाच वारकरी जखमी
मोटारसायकल अपघातात दिंडीतील पाच वारकरी जखमी

घारगाव : कार्तिकी वारीसाठी आळंदीकडे निघालेल्या दिंडीमधील वारक-यांना पाठीमागून येणा-या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच वारकरी जखमी झाले. तर दुचाकीवरील एक जण जखमी झाला आहे. हा अपघात बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी फाट्याजवळ घडला. 
 डोळासने येथील रात्रीचा मुक्काम संपवून हे सर्व वारकरी बुधवारी सकाळी घारगाव (ता. संगमनेर) येथे बबन रामचंद्र आहेर यांच्या घरी सकाळचे जेवण करून एक वाजण्याच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गाने पुण्याच्या दिशेने आळंदीकडे जाण्यासाठी निघाले होते. दिंडीच्या पाठिमागून भरधाव निघालेल्या (एम.एच-४१, ए. ई. ९६०२) या हिरव्या रंगाच्या दुचाकीने दिंडीतील वारक-यांना पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात  प्रकाश श्रीधर पाटील, विमल सुरेश निकम, इंदूबाई अर्जुन निकम, गोजाबाई छगन धनगर, कमलाबाई धनगर सर्व (रा.मंगरूळ, ता.चोपडा, जि. जळगाव) हे वारकरी जखमी झाले. जखमींमध्ये ४ महिला आणि १ पुरुष वारक-यांचा समावेश आहे.  दुचाकीवरील भाईदास मधुकर राठोड व लक्ष्मण भिकन चव्हाण दोघेही (रा.तळेगाव, ता.चाळीसगाव, जि. जळगाव) किरकोळ जखमी झाले. उपचारासाठी जखमींना आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. ही पायी दिंडी जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यातील आहे. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख,संतोष खैरे, विशाल कर्पे, होमगार्ड रवींद्र देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. 
 

Web Title: Five injured in Dindi motorcycle accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.