विद्युत खांब, पथदिवे काढल्यास फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 01:09 PM2019-06-25T13:09:35+5:302019-06-25T13:10:23+5:30

विद्युत खांबासह पथदिवे काढून घेण्याचा प्रयत्न केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी तंबीच उपायुक्त प्रदीप पठारे यांनी विद्युतीकरणाची कामे करणाऱ्या ठेकेदारांना दिली आहे़

Electric pillars, streetlights, foreclosure | विद्युत खांब, पथदिवे काढल्यास फौजदारी

विद्युत खांब, पथदिवे काढल्यास फौजदारी

Next

अहमदनगर : विद्युत खांबासह पथदिवे काढून घेण्याचा प्रयत्न केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी तंबीच उपायुक्त प्रदीप पठारे यांनी विद्युतीकरणाची कामे करणाऱ्या ठेकेदारांना दिली आहे़ त्यामुळे महापालिकेत थकीत देयकावरून प्रशासन व ठेकेदारांमध्ये पुन्हा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे़
महापालिकेच्या विद्युत विभागाने सन २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये शहरासह उपनगरांत विद्युतीकरणाची १४४ कामे केली़ सुमारे ४ कोटी रुपये खर्चून विद्युत खांबावर पथदिवे बसविण्यात आले़ मात्र या कामांची बिले अद्याप तपासण्यात आली नाही़ त्यामुळे ठेकेदारांना या कामांची बिले मिळाली नाही़ ही थकीत देयके मिळावी, या मागणीसाठी ठेकेदारांनी पथदिवे व विद्युत खांब काढून घेण्याबाबत महापालिकेला पत्र दिले़ त्यावर महापालिकेचे उपायुक्त पठारे यांनी ठेकेदारांना साहित्य काढून घेतल्यास कारवाई करण्यात येईल, अशा आशयाचे पत्र दिले आहे़ ही कामे घेताना पालिका व ठेकेदारांमध्ये करार झालेला आहे़ या कराराचीही पठारे यांनी ठेकेदारांना आठवण करून दिली असून,करारातील अटी शर्तींचे अवलोकन करण्याच्या सूचना पठारे यांनी पत्राव्दारे केल्या आहेत़
महापालिकेत पूर्णवेळ विद्युत अभियंता नाही़ त्यामुळे विद्युतीकरणाच्या कामांची तपासणी झाली नाही़ पूर्णवेळ विद्युत अभियंता मिळावा, यासाठी पालिकेने नाशिक येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिलेले आहे़ परंतु, अद्याप विद्युत अभियंता पालिकेत हजर झालेले नाहीत़ त्यामुळे ठेकेदारांची बिले थकली असून, विद्युत अभियंता हजर झाल्यानंतर बिले अदा करण्यात येतील, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे़ परंतु, काम करून दोन वर्षांहून अधिक काळ उलटून गेला़ पण, पैसे मिळालेले नाहीत़ ते अदा करावेत, अशी ठेकेदारांची मागणी आहे़

च्महापालिकेत १८ कंत्राटी वीजतंत्री कार्यरत आहेत़ वेतन वाढवून देण्याची त्यांची मागणी आहे़ मात्र महापालिकेकडून दखल घेतली जात नसल्याने दहा वीजतंत्री १४ जूनपासून संपावर गेलेले आहेत़ उर्वरित ८ वीजतंत्रींवर शहरातील दिवाबत्तीची जबाबदारी आहे़ त्यामुळे शहरातील दिवाबत्तीचा खेळखंडोबा झाला आहे़

विद्युत विभागाचा पदभार असला तरी या विभागाची पदवी आपल्याकडे नाही़ त्यामुळे ही बिले तपासण्यास नकार दिला़ विद्युत अभियंता मिळावा, यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार सुरू आहे़ विद्युत अभियंता हजर झाल्यानंतर बिले तपासण्यात येतील़
- कल्याण बल्लाळ, विद्युत विभाग प्रमुख

Web Title: Electric pillars, streetlights, foreclosure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.