शाळेतील खिचडीला मिळणार ठसकेबाज ‘फोडणी’; शाळांमध्ये आता पाककृती स्पर्धा, १ ते १५ सप्टेंबरदरम्यान आयोजन 

By चंद्रकांत शेळके | Published: August 31, 2023 07:37 PM2023-08-31T19:37:16+5:302023-08-31T19:37:36+5:30

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

Culinary competition in schools now, held from 1st to 15th September | शाळेतील खिचडीला मिळणार ठसकेबाज ‘फोडणी’; शाळांमध्ये आता पाककृती स्पर्धा, १ ते १५ सप्टेंबरदरम्यान आयोजन 

शाळेतील खिचडीला मिळणार ठसकेबाज ‘फोडणी’; शाळांमध्ये आता पाककृती स्पर्धा, १ ते १५ सप्टेंबरदरम्यान आयोजन 

googlenewsNext

अहमदनगर : प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शिवाय देशात सप्टेंबर महिना पोषणमाह म्हणूनही साजरा होतो. याचनिमित्ताने शालेय पोषण आहाराची गोडी वाढावी म्हणून शाळा व तालुकास्तरावर पाककृती स्पर्धांचे आयोजन १ ते १५ सप्टेंबरदरम्यान केले जाणार आहे. त्यातील उत्कृष्ट पाककृतींना बक्षिसेही मिळणार आहेत.

जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना दुपारी दररोज पोषण आहार दिला जातो. जिल्ह्यात ४ हजार ५४८ शाळांतील ४ लाख ७२ हजार ८९४ विद्यार्थी रोज ही खिचडी खातात. परंतु अनेक ठिकाणी ही खिचडी बेचव असल्याच्या तक्रारी आहेत. त्यात पौष्टिक तृणधान्ये समाविष्ट करून खिचडी अधिक रूचकर व्हावी, या हेतूने ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. याशिवाय बहुतांश शाळांमधून मोठ्या प्रमाणात शाळा व्यवस्थापन समिती, पालक, विद्यार्थी व शिक्षक यांच्या सहकार्याने परसबाग विकसित केलेल्या आहेत. या परसबागेतील उत्पादित भाजीपाल्याचा समावेश नियमितपणे आहारामध्ये देखील करण्यात येत आहे. 
केंद्र सरकारने देखील आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने तृणधान्य विषयक जनजागृती करण्याचे निर्देश दिलेले आहेत. बदलत्या जीवनशैलीत जंकफूड खाण्याच्या सवयीमुळे आहारातून पौष्टिक तृणधान्यांचा वापर कमी होत चालला आहे. मुलांचा आहार कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वांनी समृद्ध असणे आवश्यक आहे. ही गरज तृणधान्यामधून भागविणे शक्य आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच तृणधान्ययुक्त आहाराची सवय लावणे आवश्यक आहे. याकरिता तृणधान्यापासूननिर्मित विविध पाककृतींचा समावेश दैनंदिन आहारामध्ये केल्यास मुलांना वेगळेपणा मिळेल व हा आहार विद्यार्थी आवडीने खाऊ शकतील, याच हेतूने ही पाककृती स्पर्धा आयोजित केली आहे.
 
अशी असेल स्पर्धा
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शाळा स्तरावरील स्पर्धा आयोजित केली जाईल. त्यात शालेय पोषण आहार शिजवणारे स्वयंपाकी, मदतनीस किंवा पालकही सहभागी होऊ शकतात. त्यातून उत्कृष्ट पाककृतींची निवड तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी होईल. तालुका स्तरावरील स्पर्धा दुसऱ्या आठवड्यामध्ये घेण्यात येईल.

तालुका स्तरीय पाककृतींना असे मिळेल बक्षीस

  1. प्रथम - ५ हजार
  2. द्वितीय - साडेतीन हजार
  3. तृतीय - अडीच हजार

 
अनुदानाची मागणी करा
विहीत कालावधीत स्पर्धांचे नियोजन करून जास्तीत जास्त शाळांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, तसेच शिक्षणाधिकाऱ्यांनी बक्षिसाच्या रकमेसाठी अनुदानाची मागणी शिक्षण संचालनालयाकडे करावी, अशा सूचना शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Web Title: Culinary competition in schools now, held from 1st to 15th September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.