काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री बी. जे. खताळ यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 07:18 AM2019-09-16T07:18:43+5:302019-09-16T07:19:28+5:30

१९६९ मध्ये प्रत्यक्ष कारखाना सुरू झाला. याकामी दत्ता देशमुख,  भास्करराव दुर्वे,  भाऊसाहेब थोरात,  दत्ताजीराव मोरे,  पंढरीनाथ आंबरे आदी मंडळींची त्यांना मोलाची साथ लाभली.

Congress Senior Leader And Former Minister B. J. Khatal passed away | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री बी. जे. खताळ यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री बी. जे. खताळ यांचे निधन

googlenewsNext

संगमनेर (अहमदनगर) : राज्याचे माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांचे सोमवारी (१६ सप्टेंबर) पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास संगमनेर शहरातील रंगारगल्ली येथील त्यांच्या राहात्या घरी निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. खताळ पाटील यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी चार वाजता शहरातील प्रवरा नदीतिरावरील अमरधाममध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

राज्याच्या राजकारण, सहकार, शेती, शिक्षण, साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या खताळ पाटील यांचा जन्म १६ मार्च १९१९ ला संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे झाला. त्यांचे शिक्षण धांदरफळ, संगमनेर, बडोदा, पुणे इथे झाले. सन १९४३ ते १९६२ याकाळात नामांकित वकील म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. १९५२ ला कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेरमधून पहिली निवडणूक त्यांनी लढवली होती. या निवडणुकीत दत्ता देशमुख यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. १९५७ मध्ये संयुक्त महाराष्ट्र व्हावा असे त्यांना मनापासून वाटत होते. मात्र, कॉंग्रेसची भूमिका यासाठी अनुकूल नसल्याने त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. १९६२ च्या निवडणुकीत मध्ये पहिल्यांदा ते कॉंग्रेसच्या वतीने विजयी झाले. १९५८ च्या सुमारास संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना उभारणीची संकल्पना घेऊन कारखान्याचे मुख्य प्रवर्तक (चीफ प्रमोटर) म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली होती.

१९६९ मध्ये प्रत्यक्ष कारखाना सुरू झाला. याकामी दत्ता देशमुख,  भास्करराव दुर्वे,  भाऊसाहेब थोरात,  दत्ताजीराव मोरे,  पंढरीनाथ आंबरे आदी मंडळींची त्यांना मोलाची साथ लाभली. १९६२ ला महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर स्थापन झालेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पहिल्या मंत्रिमंडळातील हयात असलेले एकमेव मंत्री म्हणून त्यांचा उल्लेख केला जायचा. वयाच्या ६५ व्या वर्षी निवडणुकीच्या राजकारणातून स्वयंप्रेरणेने निवृत्ती घेतल्यावर योगा,  प्राणायाम, विपश्यना, चिंतन, मनन यात त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतले होते. १९६२ ते १९८५ या काळात आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीचा अपवाद वगळला तर सातत्याने कॉंग्रेस पक्षाच्यावतीने विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले. दिवगंत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण,  दादासाहेब कन्नमवार, वसंतराव नाईक, ए. आर. अंतुले, बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे, कृषी, नियोजन, सहकार, अन्न व नागरी पुरवठा,  विधी व न्याय,  प्रसिद्धी, माहिती, परिवहन आदी खात्यांचे मंत्रिपद भूषविले. आणि या प्रत्येक खात्यावर आपल्या कर्तृत्वाची छाप टाकली. राज्यात त्यांच्या काळात सर्वाधिक धरणांची निर्मिती झाली. कोल्हापूरचे दुधगंगा- वेदगंगा, सांगलीचे चांदोली-नांदोली, साताºयाचे धोम,  पुण्याचे चासकमान, वध्यार्चे अप्पर वर्धा, नांदेडचे विष्णुपुरी याचबरोबर राहुरीच्या मुळा धरणाला गती देण्याचे कामही त्यांच्याच काळात झाले. कठोर शिस्त, कमालीची तत्वनिष्ठा आणि प्रामाणिकपणा यामुळे राज्यात वेगळी ओळख होती. त्यांनी वयाच्या ९३ वर्षी लिहायला सुरुवात करत पुढील आठ नऊ वर्षात सात पुस्तके लिहिली. वाळ्याची शाळा हे पुस्तक वयाच्या १०१ व्या वर्षी लिहून देशातील सर्वात वयोवृद्ध लेखक म्हणून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

Web Title: Congress Senior Leader And Former Minister B. J. Khatal passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.