Arnab Goswami arrested immediately; Congress demand | अर्णब गोस्वामीला तत्काळ अटक करा; काँग्रेसची मागणी

अर्णब गोस्वामीला तत्काळ अटक करा; काँग्रेसची मागणी

संगमनेर : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषत: पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. हा हल्ला होण्याच्या तीन दिवस आधी म्हणजे २३ फेब्रुवारी २०१९ ला याची माहिती अर्णब गोस्वामी यांना कशी मिळाली? त्यांनी अजून कोणाला ही माहिती दिली का ? या सर्व प्रकाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्याकरिता गोस्वामींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संगमनेर तालुका काँग्रेसच्यावतीने करण्यात आली.

या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांना शुक्रवारी (दि.२२) देण्यात आले. यावेळी संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, सुभाष सांगळे, सुरेश झावरे, निर्मला गुंजाळ, निखील पापडेजा, कचरु पवार, शालन गुंजाळ, विजय रहाणे, हैदरअली सय्यद, दत्तू कोकणे, शेखर सोसे, तात्या कुटे, शिवाजी गोसावी आदी यावेळी उपस्थित होते.

तांबे म्हणाल्या, गोस्वामी याला देशाच्या सुरक्षेसंदर्भातील अत्यंत गोपनीय माहिती कोणी दिली ? त्याने ती माहिती आणखी किती लोकांना दिली ? केंद्र सरकारमधील कोण महत्त्वाच्या व्यक्ती अर्णब गोस्वामीला गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवत आहेत का ? अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. गोस्वामी आणि त्याच्या रिपब्लिक टीव्हीने अनेक बेकायदेशीर कृत्य केली असून दूरदर्शनची सॅटेलाईट फ्रिक्वन्शी बेकायदेशीर वापरून प्रसार भारतीचे करोडो रुपयांचे नुकसानही केले आहे. टीआरपी घोटाळ्याची चौकशी करताना या बेकायदेशीर कृत्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळेच जनतेचा पैसा लुबाडणा-या अर्णब गोस्वामी विरोधात केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी.

 

Web Title: Arnab Goswami arrested immediately; Congress demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.