‘मन की बात’वेळी वाजविल्या टाळ्या-थाळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:12 AM2020-12-28T04:12:21+5:302020-12-28T04:12:21+5:30

केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी, तसेच दिल्लीत सुरू असलेल्या किसान आंदोलनाला पाठिंबा म्हणून टाळ्या-थाळ्या वाजविण्यात ...

Applause during 'Mann Ki Baat' | ‘मन की बात’वेळी वाजविल्या टाळ्या-थाळ्या

‘मन की बात’वेळी वाजविल्या टाळ्या-थाळ्या

Next

केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी, तसेच दिल्लीत सुरू असलेल्या किसान आंदोलनाला पाठिंबा म्हणून टाळ्या-थाळ्या वाजविण्यात आल्याचे समाजवादी जनपरिषदेच्या नेत्या ॲड. निशा शिवूरकर यांनी सांगितले. दिल्लीतील सुरू असलेल्या किसान आंदोलनाला २५ डिसेंबर रोजी एक महिना पूर्ण झाला. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे हे शेतकरीविरोधी आहेत. हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातील शेतकरी दिल्लीत आंदोलन करीत आहेत. या आंदोलनात सहभागी झालेल्या ३४ शेतकऱ्यांना आपला जीव गमावावा लागला आहे. मात्र, तरीही केंद्र सरकार आपली भूमिका बदलण्यास तयार नाही. मोदी सरकार शेतकऱ्यांपेक्षा अदानी, अंबानी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हित पाहत आहे. कामगार, सर्वसामान्य माणूस, शेतकरी यांच्याशी या सरकारला काहीही देणेघेणे नाही. दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी आणि देशातील सर्वच राज्यांतील शेतकरी यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. केंद्र सरकार आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधण्याऐवजी किसान आंदोलनाची बदमानी करीत आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाला विरोध करण्यासाठी, सरकारला जाग येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमावेळी टाळ्या-थाळ्या वाजविण्यात आल्याचे ॲड. शिवूरकर यांनी सांगितले.

किसान संघर्ष समितीचे संगमनेर तालुक्याचे संयोजक शिवाजी गायकवाड, सहसंयोजक अनिल गुंजाळ, मातंग एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर राक्षे, अनिल कढणे, शांताराम गोसावी, इंदुमती घुले, दशरथ हासे, ॲड. अनिल शिंदे, अशोक डुबे, संगीता राक्षे, मनीष राक्षे आदी यात सहभागी झाले होते.

..............

दिल्लीत शेतकरी आंदोलनाला एक महिना पूर्ण होऊनही केंद्र सरकार त्याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही. केंद्र सरकार शेतकरीविरोधी आहेच; परंतु हे सरकार कामगारविरोधीदेखील आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी, कामगार देशोधडीला लागतील, अशी भीती वाटत आहे.

-ज्ञानेश्वर राक्षे, जिल्हाध्यक्ष मातंग एकता आंदोलन, अहमदनगर

-------------

फोटो नेम : २७१२२०२० टाळ्या-थाळ्या, संगमनेर (दोन फोटो)

ओळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमावेळी किसान संघर्ष समितीच्या वतीने टाळ्या-‌थाळ्या वाजवीत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

Web Title: Applause during 'Mann Ki Baat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.