Akole's daughter discovers corona diagnostic kit in 15 minutes; Recognition from NIV, Pune | अकोलेच्या लेकीचा शोध! अवघ्या १५ मिनिटांत कोरोनाचे निदान; किटला एनआयव्हीकडून मान्यता

अकोलेच्या लेकीचा शोध! अवघ्या १५ मिनिटांत कोरोनाचे निदान; किटला एनआयव्हीकडून मान्यता

हेमंत आवारी
अकोले : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला की नाही याचे निदान अवघ्या १५ मिनिटात करणाऱ्या ‘टेस्ट किट’च्या निर्मितीत अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील संशोधक शितल रंधे-महाळुंकर हिचे मोठे योगदान आहे. या किटला पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (एनआयव्ही) यांच्याकडून मान्यता मिळाली आहे.
शितल रंधे यांचे अकोले तालुक्यातील पिंपळदरी हे माहेर आहे. त्यांचे शिक्षण एम.एस्सी. बायोटेक झाले असून, त्या कुसगाव (पुणे) येथील ‘इम्नो’ सायन्स या कंपनीत संशोधन आणि विकास (रिसर्च अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट) विभागात प्रमुख आहेत. गेल्या चार-पाच वर्षांपासून त्या विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत. या कंपनीने प्रेग्नन्सी, डेंग्यु, एचआयव्ही, एचसीव्ही याचे निदान करणाऱ्या टेस्ट किट बनविल्या आहेत. कोरोना महामारीच्या संकटात विषाणू प्रादुर्भाव ओळखण्याची किट तयार करावी, अशी कल्पना पुढे आली. कंपनीतील शितल रंधे-महाळुंकर यांच्या नेतृत्वाखाली अतुल तरडे (एम.एस्सी.बायोटेक), अविनाश तुळसकर, अमृत कोरे, वर्षा गुंजाळ (ही पिंपळदरी, ता. अकोले येथील आहे), अवधुत सातपुते, ललित बारावकर, हनुमंत गोयकर यांनी संशोधनाच्या कामास सुरुवात केली. प्रथम किट बनवण्यासाठी परवानगी मिळवली. त्यासाठी लागणारा कच्चा माल भारताबाहेरुन मागविला. लॉकडाऊनमुळे हे साहित्य मिळण्यास थोडा विलंब झाला. तरीही जास्त वेळ मेहनत घेवून अल्पावधीत टेस्ट किट विकसीत केली आहे. किट पुण्यातील आयसीएमआर/ एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविल्या. दोन दिवसात एनआयव्ही पुणे कडून मान्यता मिळाली. सेंट्रल ड्रग स्टॅन्डर्ड कन्ट्रोल आॅरगनायझेशन (सीडीएससीओ) कडून तपासणी अहवाल आल्यानंतर कोरोनो विषाणू चाचणी किट उत्पादनाची परवानगी मिळाली आहे. १५ मिनिटांत कोरोना विषाणू प्रादुर्भाव झाला की नाही? याचे निदान या किटमुळे होते. लवकरच हे किट बाजारात उपलब्ध होत आहे.

संशोधन क्षेत्रात आवड होती. गेल्या चार वर्षांपासून कंपनीत संशोधन विभाग सांभाळते. एम.एस्सी. बायोटेक असलेले माझे काका अतुल तरडे यांच्यामुळे काम करण्याची संधी मिळाली. कोरोना महामारी संकटाच्या काळात आपल्या देशासाठी काहीतरी संशोधन कार्य करण्यात सहभाग नोंदवण्याचे भाग्य मिळाले याचे समाधान वाटते.
- शितल रंधे-महाळुंकर

शितल शहरातील कन्या शाळेत दहावीपर्यंत तर बारावीपर्यंत अकोले महाविद्यालयात होती. पुणे विद्यापिठातून तिने बायोटेक मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. तिने मोठ्या संकटकाळात संशोधनातून देशासाठी चांगले योगदान दिले, याचा अभिमान पिंपळदरीसह सर्व अकोलेकरांना आहे.
-हौशीराम बन्सी रंधे, शितलचे वडिल व माध्यमिक शिक्षक

Web Title: Akole's daughter discovers corona diagnostic kit in 15 minutes; Recognition from NIV, Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.