क्रीडा क्षेत्रातील जामखेडचा ४८ वर्षीय ‘आयर्नमॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 02:43 PM2019-11-03T14:43:13+5:302019-11-03T14:45:35+5:30

पणजी (गोवा) येथील  ‘आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन ७०.३’ (धावणे, पोहणे, सायकलिंग) या स्पर्धेत जामखेड येथील डॉ. पांडुरंग सानप यांनी वयाच्या ४८ व्या वर्षी जेतेपद पटकाविले.

2-year-old 'Ironman' of Jamkhed in sports field | क्रीडा क्षेत्रातील जामखेडचा ४८ वर्षीय ‘आयर्नमॅन’

क्रीडा क्षेत्रातील जामखेडचा ४८ वर्षीय ‘आयर्नमॅन’

Next

अशोक निमोणकर । 

जामखेड : पणजी (गोवा) येथील  ‘आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन ७०.३’ (धावणे, पोहणे, सायकलिंग) या स्पर्धेत जामखेड येथील डॉ. पांडुरंग सानप यांनी वयाच्या ४८ व्या वर्षी जेतेपद पटकाविले. यासह दोन वर्षात त्यांनी अनेक धावण्याच्या स्पर्धेत जेतेपद पटकाविली आहेत. ते आता जामखेडचे ‘आयर्नमॅन’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.
डॉ. सानप जामखेड येथे वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. ते मूळचे सौताडा (ता. पाटोदा, जि. बीड) येथील रहिवासी आहेत. येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या खुल्या जागेत ते दररोज सकाळी धावण्याचा सराव करतात. येथील भुतवडा तलाव, सौताडा तलाव या सहा किमी अंतरावर सायकलने जाऊन ते पोहोण्याचा सराव करतात. या गोष्टींचा नित्यक्रम ते चुकवू देत नाहीत. त्यामुळे त्यांनी वयाच्या ४८ व्या वर्षीही धावण्याच्या स्पर्धेतील अनेक पदके जिंकली आहेत.
डॉ. सानप यांनी गोवा राज्यातील पणजी येथील आंतरराष्ट्रीय आर्यनमॅन ७०.३ स्पर्धेत २० आॅक्टोबर २०१९ रोजी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत जगातील २७ देशातील स्पर्धेक सहभागी झाले होते. राज्यातील ६० जणांनी यामध्ये सहभाग नोंदविला. या स्पर्धेत १.९ किलोमीटर जलतरण, ९० किलोमीटर सायकल चालवणे, २१ किलो मीटर धावणे हे सर्व लक्ष्य न थांबता ८ तास ३० मिनिटांमध्ये पूर्ण करायचे होते. डॉ. सानप यांनी हे लक्ष्य ७ तास २९ मिनिटांमध्ये निश्चित वेळेआधी एक तास पूर्ण केले. 
ट्रायथलॉन १.५ किलोमीटर जलतरण, ४० किलोमीटर सायकलिंग व १० किलो मीटर धावणे या स्पर्धेत त्यांनी अव्वल क्रमांक पटकाविला. औरंगाबाद, सातारा, नगर, पुणे व मुंबई येथील हाफ मॅरेथॉन (२१ किमी) मॅरेथॉन (४२ किमी), अल्ट्रामॅरेथॉन (५०/६० किमी) अशा अनेक स्पर्धा पूर्ण केल्या आहेत. त्यात जेतेपदे पटकाविली आहेत. ९ सप्टेंबर २०१८ ला जम्मू काश्मीर राज्यातील लढाख येथे हाफ मॅरेथॉन स्पर्धा ११ हजार फूट उंचीवर आॅक्सिजनची कमतरता असतानाही त्यांनी पूर्ण केली होती. त्याबद्दल त्यांना पदक मिळाले होते.
जीवनात सर्वाधिक महत्त्व उत्तम आरोग्याला द्यायला हवे. शारीरिक तंदुरुस्ती हीच खरी धनसंपदा आहे. व्यायामाच्या आवडीतून सराव करत होतो. त्यातूनच आत्मविश्वास निर्माण झाला आणि विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ लागलो, असे  विजेते डॉ. पांडुरंग सानप यांनी सांगितले.

Web Title: 2-year-old 'Ironman' of Jamkhed in sports field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.