धोत्री येथील दरोड्यात दोन जण गंभीर जखमी, ७४ हजारांचा ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 12:51 PM2018-08-28T12:51:20+5:302018-08-28T12:55:50+5:30

जामखेड तालुक्यातील धोत्री येथे जाधव वस्तीवर दादासाहेब जाधव यांच्या घरावर चार दरोडेखोरांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

2 people injured in robbery at ahmednagar | धोत्री येथील दरोड्यात दोन जण गंभीर जखमी, ७४ हजारांचा ऐवज लंपास

धोत्री येथील दरोड्यात दोन जण गंभीर जखमी, ७४ हजारांचा ऐवज लंपास

googlenewsNext

जामखेड - जामखेड तालुक्यातील धोत्री येथील जाधव वस्तीवर दादासाहेब जाधव यांच्या घरावर चार दरोडेखोरांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. लाथा व दगडाने दरवाजा उघडून जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांना सत्तूर व लोखंडी हत्याराने मारहाण करत दरोडेखोर 74 हजार रुपये व सोन्याचे दागिने घेऊन फरार झाले आहेत. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीला उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादासाहेब आजीनाथ जाधव (वय 29 रा. जाधव वस्ती, धोत्री शिवार जामखेड) सोमवारी (27 ऑगस्ट)  रात्री कुटुंबीयांसमवेत झोपले असताना चार दरोडेखोरांनी घराच्या दरवाजा लाथा आणि दगड मारून उघडला. तसेच दरोडेखोरांनी दादासाहेब जाधव व त्यांची पत्नी शितल यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. घरातील कपाट उघडून करून त्यातील तीन तोळ्याचे डोरले, गंठन, झुंबर जोडे व तीन विविध कंपन्यांचे मोबाईल असा 74 हजाराचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला. या दरम्यान जाधव यांचे वडील आजीनाथ निवृत्ती जाधव व आई नर्मदा यांनी विरोध केला असता त्यांना सत्तूर व लोखंडी पासने डोक्यात व छातीवर मारहाण करून गंभीर जखमी करत दरोडेखारांनी पळ काढला. 

जखमी आजीनाथ निवृत्ती जाधव व नर्मदा जाधव यांना वस्तीवरील लोकांनी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. आजीनाथ जाधव यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नगर येथे उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. दरोडा प्रकरणाची पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. दरोड्याच्या घटनांमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


 

Web Title: 2 people injured in robbery at ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.