जिल्हा परिषद करणार शेतकरी, गोपालकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 13:05 IST2019-01-05T13:04:11+5:302019-01-05T13:05:57+5:30
जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणारे प्रगतिशील शेतकरी, आदर्श गोपालक पुरस्कारांचे वितरण सोमवारी (दि़७) सकाळी साडेनऊ वाजता बंधन लॉन्स येथे होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे यांनी दिली़

जिल्हा परिषद करणार शेतकरी, गोपालकांचा गौरव
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणारे प्रगतिशील शेतकरी, आदर्श गोपालक पुरस्कारांचे वितरण सोमवारी (दि़७) सकाळी साडेनऊ वाजता बंधन लॉन्स येथे होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे यांनी दिली़
दरवर्षी जिल्हा परिषदेच्यावतीने प्रगतिशील शेतकरी व आदर्श गोपालकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते़ प्रत्येक
जिल्हा परिषद गटातील १ शेतकरी व १ गोपालक यांची या
पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे़
जिल्ह्यातील १४ तालुक्यात ७३ जिल्हा परिषद गट आहेत़ तर १४ पंचायत समित्या आहेत़ प्रत्येक सदस्य व पंचायत समितीचे सभापती यांनी सुचविलेले प्रत्येकी १ शेतकरी व गोपालक यांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे़ त्याशिवाय कुक्कुटपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी संगमनेर तालुक्यातील दोघांना आदर्श कुक्कुटपालक म्हणून गौरविण्यात येणार आहे़ त्यामुळे ८७ शेतकरी व ८७ गोपालक आणि दोन कुक्कुटपालक अशी मिळून पुरस्कारार्थींची संख्या १७६ झाली आहे़ त्याशिवाय गावरान बियाण्यांची बँक तयार करणाऱ्या कोंभाळणे (ता़ अकोले) येथील सीड मदर राहीबाई पोपेरे यांचाही विशेष सन्मान या कार्यक्रमात करण्यात येणार आहे़ कार्यक्रमस्थळी चारा साक्षरता अभियानअंतर्गत प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत, असे फटांगरे म्हणाले़
पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ
नगर जिल्ह्यातील ६२ पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ मानांकित झाली आहेत़ या दवाखान्यांमध्ये सर्व सोयी पुरविण्यात आल्या असून, इतर आवश्यक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत़ त्यामुळे जनावरांवर वेळेत व योग्य उपचार मिळू लागले आहेत़ त्यामुळे या दवाखान्यांच्या प्रमुखांचा सोमवारी होणा-या कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे़
विखे, थोरातांच्या मनोमिलनासाठी लांबला कार्यक्रम
प्रगतिशील शेतकरी व आदर्श गोपालकांना पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे़ मात्र, या कार्यक्रमात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्यात मनोमिलन घडविण्यासाठी सभापती फटांगरे व काही जिल्हा परिषद सदस्य आग्रही होते़ पण विखे व थोरात यांच्या तारखेचा मेळ बसत नव्हता़ त्यामुळे हा कार्यक्रम लांबणीवर पडला होता, असे सूत्रांनी सांगितले़