गावोगावी झळकणार जिल्हा परिषद शाळांचे फ्लेक्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 14:43 IST2018-05-17T14:42:52+5:302018-05-17T14:43:41+5:30
पटसंख्या वाढविण्यासाठी खासगी शाळांचा जाहिरातीवर भर असतो़ जिल्हा परिषदेकडून मात्र कुठल्याही प्रकारची जाहिरात केली जात नव्हती़

गावोगावी झळकणार जिल्हा परिषद शाळांचे फ्लेक्स
अहमदनगर : पटसंख्या वाढविण्यासाठी खासगी शाळांचा जाहिरातीवर भर असतो़ जिल्हा परिषदेकडून मात्र कुठल्याही प्रकारची जाहिरात केली जात नव्हती़ यंदा जिल्हा परिषदेनेही पटसंख्या वाढविण्यासाठी जाहिरात करण्याचा निर्णय घेतला असून, गावोगावी जिल्हा परिषद शाळांचे फ्लेक्स झळकणार आहे़
सभापती राजश्री घुले यांच्या अध्यक्षातेखाली जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सभा मंगळवारी पार पडली़ या सभेत वरील निर्णय घेण्यात आला़ शहरासह जिल्ह्यातील खासगी संस्था चालकांकडून पटसंख्या वाढविण्यासाठी शाळांची जाहिरात करण्यात येते़ त्यामुळे त्यांची पटसंख्या वाढते़ त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या शाळांवर होतो़ त्यावर सभेत वरील तोडगा काढण्यात आला आहे़ जिल्हा परिषदेच्या शाळांचे निकाल, शाळेत मिळणाऱ्या सुविधा, शिक्षणाचा दर्जा आणि निकालाची परंपरा, याबाबतचे जाहिरातीचे फलक गावाच्या दर्शनी भागात लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ येत्या जूनमध्ये शाळा सुरू होतील़ त्यापूर्वीच जाहिरातीचे फलक तयार करून ते लावण्यात येणार आहेत़ त्यामुळे शाळांची पटसंख्या वाढेल, असा दावा शिक्षण समितीकडून केला आहे़
शिक्षण मंडळाकडून मध्यंतरी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली़ या परीक्षेला सर्व शाळांतील विद्यार्थी बसविण्याचा निर्णय शिक्षण समितीत झाला होता़ त्यासाठी समितीने विशेष निधीची तरतूद केली होती़ मात्र जिल्ह्यातील काही शाळांनी शंभर टक्के मुले परीक्षेला बसविले नसल्याचे निदर्शनास आले आहे़ अशा शाळांचा शोध घेऊन मुख्याध्यापकांवर कारवाई केली जाणार आहे़ अनेक शाळांमध्ये तक्रार पेट्या बसविण्यात आल्या नाहीत़ तक्रार पेट्या नसणाºया शाळांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे़ शिक्षक सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करत असल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत़ यापुढे असे प्रकार घडल्यास कठोर कारवाई करण्याचा आदेश शिक्षण विभागाला देण्यात आला आहे़ यावेळी चर्चेत शिक्षण समितीचे सदस्य राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे, मिलिंद कानवडे, उज्वला ठुबे, विमल आगवण, राहुल झावरे यांनी सहभाग घेतला़